आमगाव,दि.०७ःअष्टविनायक दहीहंडी उत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच पायऱ्यांचा स्लॅब अचानक कोसळल्याने एकच गोंधळ उडाला.या दुर्घटनेत एकूण 21 जण जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय गोंदिया येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमगावमध्ये अष्टविनायक दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती.दहीहंडी बघण्यासाठी अनेक जण जवळील इमारतींच्या पायऱ्या आणि उंच ठिकाणी उभे राहिले होते. याच दरम्यान भिंतीलगत असलेल्या पायऱ्यांच्या स्लॅबवर अनेक लोक उभे असताना अचानक तो स्लॅब कोसळला. क्षणार्धात नागरिक खाली पडल्याने परिसरात आरडाओरडा सुरू झाला.
घटनेनंतर स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालय, आमगाव येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर 16 जणांना घरी सोडले, तर गंभीर जखमी झालेल्या 6 जणांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर उत्सवस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस आणि प्रशासनाने तातडीने परिसर सुरक्षित करून परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघात नेमका कशामुळे घडला, स्लॅब कोसळण्यामागे अतिगर्दी कारणीभूत होती का किंवा बांधकामातील त्रुटी होती का, याबाबत प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.





