29.2 C
Gondiā
Monday, September 7, 2026
Home विदर्भ पावसाअभावी पिकांच्या नुकसानीची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बांधावर जाऊन पाहणी

पावसाअभावी पिकांच्या नुकसानीची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बांधावर जाऊन पाहणी

0
10
> ◆ नुकसानीचे पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
बुलढाणा, दि. ७: पावसाने दडी मारल्यामुळे पिकांवर निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीची केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पावसाअभावी पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावर्षी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. पेरणीनंतर पिकांची वाढ चांगली झाली होती. मात्र, मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील काही भागातील पिकांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात यंदा सुमारे ३ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. सोयाबीन पीक फुलोरा व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असताना पावसाचा खंड पडल्याने पिकांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा, अटाळी, शाहापूर, आडगाव, बोरी, शिर्ला व नेमाने या गावांतील शेतशिवारांना भेट देऊन पिकांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, पावसाची आवश्यकता तसेच संभाव्य नुकसानीबाबत माहिती घेतली. पावसाचे प्रमाण हा निसर्गाशी संबंधित विषय असला तरी शेतकऱ्यांनी परिस्थितीत खंबीर राहावे, शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पावसाअभावी सुकत चाललेल्या पिकांच्या नुकसानीचे संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, तसेच नुकसानीची माहिती शासनास सादर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हा कृषी अधिकारी संतोष डाबरे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, संतोष डिवरे, अमोल अंधारे, राजू बघे, तसेच शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.