; राजीवनगर ताडगाव येथील वाल्मिकी मत्स्यसंसाधन केंद्रातील धक्कादायक प्रकार
अर्जुनी मोरगाव:गोंदिया जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गोंदियाअंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजीवनगर ताडगाव येथे संचलित ‘वाल्मिकी मत्स्यसंसाधन केंद्रात’ सुरक्षेच्या साधनांचा अभाव आणि व्यवस्थापकाच्या निर्दयी निष्काळजीपणामुळे महिला मत्स्य व्यवस्थापक रिना रॉय यांना विजेचा अतिउच्च क्षमतेचा जबर शॉक लागल्याची गंभीर घटना ८ सप्टेंबरला घडली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून ब्रह्मपुरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले.
सुरक्षेची साधने शून्य; जीवावर उदार होऊन काम
शासकीय योजनांच्या माध्यमातून मत्स्य सामूहिक शेतीचा यशस्वी व्यवसाय उभारून इतर महिलांना रोजगाराचे मार्गदर्शन करणाऱ्या रिना रॉय (मूळ गौरनगर, सध्या रा. सिरोली) या ताडगाव/राजीवनगर येथील केंद्रात मत्स्यखाद्य निर्मितीचे काम करतात. या केंद्रात कुशल कामगार नसून सर्व काम महिला मत्स्यसखी पाळ्या (शिफ्ट) लावून करतात. मात्र, येथे सुरक्षेची कोणतीही साधने — जसे की हातमोजे, गमबूट किंवा अग्निशमन यंत्रे — उपलब्ध नाहीत. प्रशासनाकडून सुरक्षेशिवाय केवळ कामाचे टार्गेट दिले जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
माहिती असूनही दुर्लक्ष: गोपाल मेश्राम यांचा बेजबाबदारपणा
घटनेच्या काही दिवसाआधी मशीनमध्ये करंट उतरत असल्याचे इतर मत्स्यसखींनी समुदाय मत्स्यव्यवस्थापक गोपाल मेश्राम यांच्या लक्षात आणून दिले होते. मात्र, “तुम्ही कामात टाळाटाळ करता,” असे म्हणत मेश्राम यांनी या गंभीर बाबीकडे साफ दुर्लक्ष केले. त्यानंतर ज्या दिवशी रिना रॉय यांची कामावर पाळी होती, त्या दिवशी त्यांना मशीनमध्ये करंट असल्याची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे काम करत असताना रिना रॉय यांना विजेचा जबर धक्का बसला.
अपघातानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना प्रथम शासकीय रुग्णालयात नेण्यात आले,तिथे प्राथमिक उपचार करुन नातेवाइकांनी त्यांना ब्रह्मपुरी येथील खाजगी रुग्णालयात भरती केले. त्यांच्या कमरेला व शरीरावर इतर ठिकाणी गंभीर जखमा झाल्या असून अद्याप त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे व्यवस्थापक नरेंद्र रहांगडाले यांनी केवळ विचारपूस केली; मात्र त्यानंतर वैद्यकीय खर्चाचे नियोजन किंवा कोणत्याही प्रकारचे सहकार्य प्रशासनाकडून केले नसल्याचे समोर आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केलेल्या केंद्रातच महिलांवर ही वेळ!
विशेष म्हणजे, या मत्स्यपालन केंद्राच्या यशाची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांनी स्वतः या केंद्राला भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते. ज्या केंद्राची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली, त्याच केंद्रातील महिला व्यावसायिकावर आज ही वेळ आली असताना शासन आणि संबंधित विभागाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे.
ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
महिला सक्षमीकरणाच्या बाता मारणाऱ्या प्रशासनाने सौ. रिना रॉय यांना अद्याप कोणतीही वैद्यकीय किंवा आर्थिक मदत पुरवलेली नाही.
-
निष्काळजीपणा करणारे समुदाय मत्स्यव्यवस्थापक गोपाल मेश्राम यांच्यावर कडक कारवाई व्हावी.
-
केंद्रातील विजेच्या मशीनची आणि सुरक्षेच्या त्रुटींची तात्काळ चौकशी करण्यात यावी.
-
पीडित महिला मत्स्य व्यवस्थापकाच्या उपचारासाठी तात्काळ शासकीय आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी.
या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण सिरोली व ताडगाव परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.





