रुग्णवाहिकेचे कंत्राटी वाहनचालक वेतनाविना

0
17
वाढदिवसाच्या शुभेच्छा

भंडारा : आरोग्य सेवेचा एक भाग असलेला रुग्णवाहिका सेवेच्या वाहनचालकांना मागील पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. परिणामी त्यांच्यावर आर्थिक संकट बळावले असून उपासमारीची वेळ आली आहे.

या संदर्भात आरोग्य मंत्र्यांना भेटूनही समस्या मार्गी निघालेली नाही. वेतन न मिळाल्याने दि. ५ जानेवारीपासून रुग्णवाहिका सेवा बंद करण्याचा इशारा जिल्हा कंत्राटी वाहन चालक असोशिएनचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डोंगरे यांनी दिला आहे.

प्रत्येक जिल्हयात ४० ते ५० रुग्णवाहिका वाहन चालक आहेत. भंडारा जिल्हयात वाहन चालकांची संख्या ६० च्या जवळपास आहे. २४ तास अल्पशा वेतनावर हे वाहन चालक कार्य करीत आहेत. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत रुग्णालयाच्या निवड समितीमार्फत ६ हजार रुपये प्रति माह वेतनावर कंत्राटी वाहन चालकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शासनस्तरावर सन २०१२ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात, व एका खाजगी कंपनीला प्रति वाहन चालक १४,७७५ रुपये याप्रमाणे देण्याचे काम देण्यात आले होते. पंरतु ती कंपनी केवळ ६ हजार रुपये देत होती.

केंद्रातील एनपीसीसी समितीने ते कंत्राटी वाहनचालक नामंजूर करुन रुग्णकल्याण समितीमार्फत ८ हजार प्रतिमाह वेतन देण्याचे ठरविले होते. त्या वाहनचालकांच्या नियुक्त्या १ आॅगस्ट २०१४ मध्ये करण्यात आल्या आहेत. पंरतु प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर स्थगिती देण्यात आल्याने वाहन चालकांचे वेतन अजूनपर्यंत मिळालेले नाही.

यासंदर्भात अधिवेशना दरम्यान मोर्चा काढून आरोग्य मंत्र्याचे लक्ष वेधण्यात आले. त्यांना निवेदनही देण्यात आले. त्यात नमूद केल्याप्रमाणे कंत्राटी रुग्णवाहीका वाहन चालकांना १५ हजार रुपये वेतन दयावे, कंत्राटी पध्दत बंद करावे, थकित वेतन देण्यात यावे, वाहन चालकांना स्थायी नोकरीत सामावून घेण्यात यावे, १५ टक्के घरभाडे व वेतन श्रेणी लागु करण्यात यावी, कार्यरत असलेल्या वाहन चालकांना कामावरुन कमी करु नये, वाहन चालकांचे पद हे मंजूर पद नव्याने सरळ सेवा भरती मार्फत करु नये, दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत वेतन देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. दिनांक १ जानेवारी पर्यंत कंत्राटी वाहन चालकांचे वेतन न झाल्यास दिनांक ५ जानेवारीपासून रुग्णवाहिका सेवा बंद करु असा खनखनीत इशाराही असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र डोंगरे यांनी दिला आहे.