भावाला उपाध्यक्ष बनविण्याचे स्वप्न भंगले; उपाध्यक्षपद भाजपाकडे

0
8

यवतमाळ दि.22: ६१ सदस्यीय यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेने पहिल्यांदाच सर्वाधिक २० जागा जिंकल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेवर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीतही भगवा फडकणार असे मानले जात होते. परंतु प्रत्यक्षात अगदी उलटेच चित्र पहायला मिळाले.शिवसेनेचे नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपले बंधू विजय राठोड यांना निवडून आणले. त्यांना उपाध्यक्ष बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते. उपाध्यक्ष पदासाठी राठोड यांचे नामांकनही दाखल करण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादीने दगाफटका केल्याने संजय राठोड यांचे भावाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष करण्याचे स्वप्न भंगले.
जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादी व अपक्षाने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. अध्यक्षपदी काँग्रेसच्या माधुरी अनिल आडे तर उपाध्यक्षपदी भाजपाचे श्याम जयस्वाल विजयी झाले. त्यांना प्रत्येकी ४१ मते मिळाली. २० मते मिळाल्याने शिवसेनेच्या कालिंदा पवार व विजय राठोड हे अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झाले.
६१ सदस्यीय यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक २० जागा शिवसेनेने पटकाविल्या. भाजपा १८, काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी ११ तर अपक्षाकडे एक जागा आहे. सत्तेचे गणित बसविण्यासाठी किमान ३१ जागांची गरज होती. सोमवारी शिवसेना व राष्ट्रवादीने युती झाल्याचे सांगत सत्ता स्थापन करणार असल्याची घोषणा संयुक्त पत्रपरिषदेत केली होती. परंतु आज प्रत्यक्ष निवडणूक निकालाअंती राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या या भूमिकेपासून घुमजाव करीत काँग्रेस व भाजपाला सभागृहात साथ दिली. त्यामुळेच शिवसेनेला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. बदललेल्या या भूमिकेमागे अलिकडेच झालेल्या विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे राजकारण असल्याचे बोलले जाते.