स्मार्ट सिटी संमेलनात शंभराहून अधिक महापौरांचा सहभाग

0
10

नागपूर दि.30 -: नागपूर महापालिकेच्यावतीने ‘स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी’ प्रकल्पाचा उद्देश लोकांपर्यंत पोहोचावा तसेच राष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून त्याचा प्रसार करण्यासाठी नोएडा येथील इलेटस् टेक्नोमीडिया प्रा.लि. यांच्या सहकार्याने नागपुरात ७ व ८ एप्रिलला स्मार्ट सिटी शिखर संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात देशभरातील शंभराहून अधिक शहरांचे महापौर व आयुक्त सहभागी होणार आहेत.
शिखर संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ७ एप्रिलला सकाळी १० वाजता तर समारोप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ एप्रिलला होणार आहे. महापौर नंदा जिचकार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहतील. केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांना संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे उपस्थित होते. शिखर संमेलनात नागपूर शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा आराखडा मांडण्यात येईल. परिषदेसाठी सर्व राज्यांचे नागरी विकास विभागाचे प्रधान सचिव, केंद्र शासनातर्फे स्मार्ट सिटी प्रकल्प हा विषय हाताळणारे अधिकारी आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाशी संबंधित सर्वच भागधारक आदींना आमंत्रित करण्यात आले आाहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विविध शहरांत सुरू असलेल्या उपक्रमांच्या माहितीची देवाण-घेवाण या परिषदेच्या माध्यमातून होणार आहे. स्मार्ट आयडिया मांडण्याच्या आणि त्या अमलात आणण्यासाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने नागपूर कसे चांगले शहर आहे, यादृष्टीने शिखर संमेलनात मांडणी करण्यात येईल. शिखर परिषद स्मार्ट शासन, स्मार्ट वाहतूक, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि स्मार्ट पर्यावरण या थीमवर आधारित आहे. कल्पनांची देवाण-घेवाण करण्यासाठी यानिमित्ताने चांगले व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. शहरातील नागरिकांना या प्रकल्पाला भेट देता येणार आहे.