शिकार करणार्‍या बिबट्याचीच ‘शिकार’

0
36

साकोली,दि.27- वासराची शिकार केल्यानंतर तलावाखालील बोगद्यात बसून शिकार खात असलेल्या बिबट्याला गावकर्‍यांनी बोगदा बुजवून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोठा)येथे उघडकीस आली. वनाधिकार्‍यांनी बिबट्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता चवताळलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात वनकर्मचारी जखमी झाले. शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले मात्र गडेगाव डेपो येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे शिकार करणार्‍या बिबट्याचीच ‘शिकार’झाल्याची चर्चा होती.
रेंगेपार (कोठा) येथील एक गुराखी गुरे घेऊन गावशेजारील तलावावर गेला होता. गुरे चरत असताना तलावावर पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्याने एका वासराची शिकार केली. वासराला घेऊन तलावाजवळ असलेल्या एका बोगद्यात जाऊन बसला व शिकार खाऊ लागला. तेवढय़ात गुराख्याच्या लक्षात ही बाब आल्याने त्याने गावात धूम ठोकत घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावकर्‍यांचा मोठय़ा जत्था घटनास्थळी दाखल झाला. तोवर बिबट्या बोगद्यातच बसून होता. गावकर्‍यांनी बोगद्याच्या दोन्ही बाजुंना दगड लावून बोगदा बुजवला व तणस टाकून पेटवून दिले.
याची माहिती वन विभागाला होताच साकोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद महेशपाठक, लाखनीचे कोळी, शरद भुजाडे, तांडेकर व अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ बोगद्यातील दगड काढून बिबट्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. प्रमोद महेशपाठक व भुजाडे यांनी बोगद्यात शिरून बेशुद्ध झालेल्या बिबट्याला बाहेर काढले. तेवढय़ात कुणीतरी बिबट्यावर पाणी टाकल्याने बिबट शुद्धीवर आला व वनपरिक्षेत्र अधिकारी महेशपाठक यांच्या पायावर हल्ला केला. हे पाहून वनक्षेत्रपाल भुजाडे यांनी बिबट्याचा प्रतिकार केला. बिबट्याने त्यांच्या हातावर हल्ला करीत जखमी केले. परंतु, भुजाडे यांनी धैर्याने बिबट्याचा हल्ला परतून लावला. त्यानंतर बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद करण्यात आले. त्याला उपचारासाठी गडेगाव डेपो येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
या संपूर्ण घटनाक्रमात गावकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. गावकर्‍यांचा वनअधिकार्‍यांशी वादही झाला. वनधिकार्‍यांनी बिबट्याला वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न केला परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. श्‍वास गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.