जिल्हा परिषद निवडणुकीची आरक्षण सोडत लवकरच

0
15

तुमसर : भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत १५ पंचायत समित्यांच्या निवडणूक विभाग व गणाकरिता दि.१९ जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वच तहसीलदारांनी जातीनिहाय मतदारांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक २०१० मध्ये झाली होती. राज्य निवडणूक आयोगाने दोन्ही जिल्ह्याकरिता निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचना व आरक्षण निश्चितीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राचे गणामध्ये विभाजन करून त्यांच्या सीमा निश्चित करण्याचा प्रारूप प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ५ जानेवारीपर्यंत सादर करणार आहेत. प्रभाग रचना प्रस्तावास मान्यता विभागीय आयुक्त १२ जानेवारीपर्यंत देतील. आरक्षण सोडतीची सूचना १५ जानेवारीला करतील. १९ जानेवारीला जिल्हा परिषदकरिता जिल्हाधिकारी व पंचायत समिती निर्वाचक गणासाठी तहसीलदार घोषणा करतील.

निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचनेची अधिसूचना दि. २२ जानेवारी हरकती व सूचना सादर करण्याचा अंतिम दि. २९ जानेवारी, हरकती व सूचनांवर सुनावणी देवून निवडणूक गण रचना अंतिम करणे दि. ९ फेब्रुवारी विभाग व गण रचनेची अधिसूचना शासन राजपत्रात १३ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी प्रसिद्ध करणार आहेत.

भंडारा जिल्हा परिषदेचे ५२ सदस्य संख्या असून तुमसर तालुक्यात नऊ सदस्य आहेत. सध्या सात पुरुष व २ महिलांचा समावेश आहे. २०१५ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत ५ पुरुष व ४ महिला सदस्य राहणार आहेत. या खेपेला दोन महिला सदस्यांत वाढ होणार आहे. महिलांकरिता ५० टक्के आरक्षण लागू झाल्याने जिल्हा परिषदेत २६ महिलांना प्रवेश मिळणार आहे.

विद्यमान जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची हृदयाची गती निश्चितच वाढली असून मतदारसंघ राखीव झाले तर जवळच्या मतदारसंघाची चाचपणी अनेक विद्यमान सदस्यांनी घेणे सुरु केले आहे. राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते सक्रीय झाल्याचे दिसतात. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय (जिल्हा परिषद) व पंचायत समितीकरिता मोर्चेबांधणीला वेग आला असल्याने राजकीय वातावरण रंगू लागले आहे.