अंधाराच्या वाटेवर तारुण्याला जपणे ही अग्निपरीक्षाच !

0
11

चंद्रपूर : ‘अंधाऱ्या वाटेवरुन प्रवास करताना प्रवासात येणाऱ्या तारुण्याला विकृत समाजापासून जपणे ही एक अग्निपरीक्षाच असते. परंतु अत्यंत गरीब समाजात जन्माला आलेल्या दृष्टिहीन मुलीला शिक्षण घेवून उच्चविद्याविभूषित होणे ही त्यापेक्षाही महाभयंकर बाब आहे’ असे मनोगत अंधत्वाचा शाप घेवून जन्माला आलेल्या आणि तरीही जीवनप्रवासाबाबत सकारात्मक भूमिका बाळगणाऱ्या राधा इटणकर बोरडे यांनी व्यक्त केले.

नवरगाव येथील स्व. बालाजी पाटील बोरकर स्मृती प्रतिष्ठानद्वारा भारतीय शिक्षण संस्था नवरगावच्यावतीने आयोजित स्मृती सोहळ्यादरम्यान राधा ईटनकर बोरडे यांना डॉ.तेजराम बुद्धे यांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला पत्रकार सुनील कुहीकर, प्रा.सदानंद बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. पाच हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राधा यांच्या नेत्रहीन आयुष्याचा संघर्ष समाजातील प्रत्येक डोळस व्यक्तीला लाजवणारा आणि प्रेरणादायी आहे. वयाच्या केवळ तिसऱ्या वर्षी रंगीबेरंगी जग बघण्याचा राधाचा अधिकार नियतीने हिरावला. स्वत:च्या मर्यादांचा बाऊ न करता प्रवाहाविरोधी संघर्षालाच त्यांनी आपलं जीवन बनविलं.

विद्यापीठातून मराठी विषयामध्ये गुणानुक्रमे द्वितीय आलेल्या राधाने समाजाला खऱ्या अर्थाने डोळस करण्याच्या सामाजिक हेतूने नागपूरच्या मानेवाडा भागात ‘लुईराम’ वाचनालयाची निर्मिती केली. त्यांच्या ह्या प्रवाहाविरोधी प्रवासाबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मागील वर्षी हा ुपुरस्कार विदर्भाच्या बहीनाबाई अंजनाबाई खुणे यांना देण्यात आला. आपल्या कर्तृत्वाने अजोड कामगिरी करणाऱ्या मात्र प्रसिद्धीपासून उपेक्षित असलेल्या कला, क्रीडा आणि साहित्यात भरीव कामगिरी करणाऱ्या महानुभावांना हा पुरस्कार दिला जातो.