गोंदिया, दि.4 : देशातील आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान कचारगडची माता कंकाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या गुंफेत माता कंकालीचे देवस्थान आहे. या श्रद्धास्थान भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. त्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी कचारगडच्या विकासाकरीता आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.आज (ता.4) सालेकसा तालुक्यातील कचारगड देवस्थानाच्या पाथवे आणि पायऱ्यांच्या बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलते होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम हे होते. जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, जि.प.समाजकल्याण समिती सभापती कुसन घासले, महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुराम, जि.प.सदस्य कल्याणी कटरे, पं.स.सभापती छाया बल्लारे, कोसमतारा/धनेगावच्या सरपंच पुजा वरकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या कचारगड देवस्थानाच्या विकासासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या विकास आराखड्यात 15 प्रकारच्या कामांचा समावेश आहे. पाथवे आणि पायऱ्यांच्या 1600 मिटरच्या बांधकामासाठी 1 कोटी 33 लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे.
पालकमंत्री पुढे म्हणाले, आदिम संस्कृतीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही संस्कृती टिकली पाहिजे, तिचे जतन झाले पाहिजे, तिचा विकास झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कचारगडच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, आदिवासी मुला-मुलींनी चांगले शिक्षण घेऊन विकासाच्या प्रवाहात आले पाहिजे.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना आमदार संजय पुराम म्हणाले, कचारगडच्या विकास कामाची प्रतिक्षा संपली असून आज प्रत्यक्ष विकास कामाची सुरुवात झाली आहे. कचारगड देवस्थानाची विकास कामे होत असल्यामुळे यात्रेकरुंना यापुढे त्रास सहन करावा लागणार नाही. कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते आदिवासी भूमीपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी कोनशिलेचे अनावरण केले. कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा जनबंधू, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी गिरीष सरोदे, समाजकल्याण सहायक आयुक्त सुरेश पेंदाम, तहसिलदार श्री सुर्यवंशी, नियोजन अधिकारी श्री गायकडवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कचारगड परिसरातील गावातील नागरिक, जमाकुडो शासकीय आश्रम शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक देवस्थान समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी केले. संचालन विजय बेले यांनी तर उपस्थितांचे आभार सहायक प्रकल्प अधिकारी पी.एन.रघुते यांनी मानले.
हाजराफॉल पर्यटन स्थळाला भेट पालकमंत्री राजकुमार बडोले हे सालेकसा तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी हाजराफॉल या पर्यटनस्थळाला भेट दिली. हाजराफॉल या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राज्यातील अनेक पर्यटक येत असल्यामुळे या पर्यटनस्थळाच्या विकासाकडे विशेष लक्ष देणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. हाजराफॉल जवळील नवाटोला या गावी वन समिती तयार करण्यात आली असून समितीच्या माध्यमातून गावातील बेरोजगार युवकांना पर्यटन स्थळाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे. इको टूरिझमच्या माध्यमातून हाजराफॉल परिसरात साहस शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
यावेळी आमदार संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, परिविक्षाधीन आय.एफ.एस.अधिकारी श्री गुरुप्रसाद, जि.प.महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुराम, पं.स.सभापती छाया बल्लारे, जि.प.सदस्य कल्याणी कटरे यांची उपस्थिती होती.
00000