व्याघ्र संरक्षणासाठी ‘महावितरण’चा पुढाकार

0
8

नागपूर,दि.01-विदर्भाच्या जंगलातील वाघांचे अस्तित्व सुरक्षित व्हावे आणि ती गगनभेदी डरकाळी पुन्हा एकदा घुमावी यासाठी ‘महावितरण’ने जागतिक व्याघ्र दिनानिमित्ताने वन विभागाच्या सोबतीने विदर्भातील सर्वदूर जंगलातील वीज वाहिन्यांची तपासणी करीत वन्यजिवांच्या संरक्षणार्थ एक पाऊल पुढे टाकले आहे.
सामाजिक दायित्व जोपासण्यात नेहमीच अग्रेसर असणार्‍या महावितरणने नेहमीच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. यापूर्वीही महावितरणने ‘गो ग्रीन’ ही संकल्पना राबवून वीजबिल छपाईसाठी लागणार्‍या कागदाचा वापर कमी केला आहे. याशिवाय पेपरलेस कार्यालयाची संकल्पना राज्यात सर्वप्रथम राबवित पर्यावरण संरक्षणात मोठय़ा प्रमाणात हातभार लावला आहे. याच र्शुंखलेत महावितरणने आता वन विभागाच्या सहयोगाने विदर्भात सर्वदूर पसरलेल्या जंगलातील वीज वाहिन्यांची तपासणी करीत विजेच्या धक्क्य़ाने वाघाचा अपघात होऊ नये, याकरिता विशेष मोहीम राबविली. महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या सूचनेनुसार महावितरणच्या अभियंते आणि कर्मचार्‍यांनी नागपूर जिल्ह्य़ातील करांडला, पेंच, पिपरिया, सिल्लारी, चंद्रपूर जिल्ह्य़ातील ताडोबा, अमरावती जिल्ह्य़ातील धारणी, मेळघाट, गोंदिया जिल्ह्य़ातील नागझिरा, वाशीम जिल्ह्य़ातील रिधोरा, वर्धा जिल्ह्य़ातील बोरधरण, पांजरा बोथली, यवतमाळ जिल्ह्य़ातील पैनगंगा, गोंदिया जिल्ह्य़ातील देवरी, अकोला जिल्ह्य़ातील पातूरसह विदर्भातील ठिकठिकाणच्या जंगलातील वीज वाहिन्यांची पाहणी केली.
वन विभागासोबत राबविलेल्या या संयुक्त मोहिमेत महावितरणचे अभियंते आणि कर्मचारी मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले. वन्य परिक्षेत्राच्या जवळपासच्या भागातील शेतीतील पिकांचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान होऊ नये याकरिता काही शेतकरी शेताच्या कुंपणात अनधिकृत वीजप्रवाह सोडतात. यामुळे वन्य प्राण्यांचा नाहक बळी जातो. हे प्रकार टाळण्यासाठी शेतकर्‍यांशी चर्चा करून त्यांना यापासून परावृत्त करणे, वीज वाहिन्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे, वाहिनींमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करणे आदी कामेही याप्रसंगी करण्यात आली. महावितरणने वन विभागासोबत अनेक ठिकाणी कायमस्वरुपी समित्यांचे गठन केले असून या समित्यांमार्फत ठिकठिकाणी वीज वाहिन्यांची नियमित पाहणी करण्यात येत आहे.