गोंदिया -शहरात सन १९८५ मध्ये निर्धारित केलेल्या ४0 वॉर्डांची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. आजही तेवढेच वॉर्ड आहेत. परंतु शहरात मतदारांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने विकासकार्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे गोंदिया शहरात १0ते १२ वार्ड आणखी वाढविण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने निवासी जिल्हाधिकारी यांना प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या नावे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांच्या नेतृत्वात दिले.
निवेदनानुसार, सद्यस्थितीत गोंदिया शहरात मतदारांच्या संख्येत मोठीच वाढ झाली आहे. विकास कार्ये करण्यात अडचणी निर्माण होतात. शासन व न्यायपालिकेव्दारे मागील १0 वर्षांपासून लागू प्रभाग पध्दतीमुळे वॉर्डांचा विकास आणखी बाधित झाला आहे. परंतु आता न्यायालयाच्या निर्देशानुसार पुन्हा वॉर्ड पध्दतीने निवडणूक करण्यास मंजुरी दिली आहे.
त्यामुळे येणार्या नगर परिषदेच्या निवडणुकीत १0 ते १२वार्ड वाढवून वॉर्डांचे पुनर्नियोजन करण्यात यावे. त्यामुळे येणार्या निवडणुकीमध्ये वॉर्ड संख्येनुसार अधिकाधिक लोकप्रतिनिधी निवडून येतील व गोंदिया शहराचा सर्वांगीण विकास होणे शक्य होईल. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या ठिकाणी नगर परिषद अध्यक्ष निवडणूक सरळ जनतेव्दारे मतदान पध्दतीतून करण्यात येते, तीच पध्दती येणार्या नगर परिषदेच्या अध्यक्षीय निवडणुकीत लागू करण्यात यावी, असे निवेदनात नमूद आहे.
निवेदनाचे वाचन जिल्हा प्रवक्ता अशोक शहारे यांनी केले. यावेळी प्रतिनिधी मंडळात जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, शहर अध्यक्षशिव शर्मा, अशोक शहारे, पंकज यादव, केतन तुरकर, मनोज दहिकार, राकेश जायस्वाल, दिनदयाल डोंगरवार, गुड्ड बिसेन, विष्णु शर्मा, ओंकार भगत उपस्थित होते.