मुख्याधिकारी, अभियंत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0
17

मंगरूळनाथ-येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता यांच्या विरोधात घर बांधकामासाठी हवी असलेली परवानगी व नकाशा यामध्ये अफरातफर केल्याची तक्रार मो. तरीक मो. याकूब रा. मंगरूळनाथ यांनी पोलिसांकडे केली होती. यावरून पोलिसांनी वरील गैरअर्जदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मो. तरीक यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी नगर परिषदेकडे घर बांधकामाची परवानगी मागितली. तसेच, घरासमोरील ले—आऊटमध्ये त्यांच्या घरासमोरील असलेल्या मोकळ्या जागेवर शेजार्‍यांनी अतिक्रमण करून पक्की भिंत बांधली. त्याबाबत रितसर तक्रार नपकडे केली होती. मात्र, संबंधितांनी याप्रकरणी कारवाई करण्यात दिरंगाई केली. यावरून या प्रकरणात आर्थिक व्यवहार करून त्यांच्या घराच्या दस्तावेज व नकाशात बदल करण्यात आल्याचा संशय त्यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. याबाबत आपल्यावर अन्याय झाल्यामुळे आपण मंगरूळनाथ पोलिसांकडे तक्रार करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी नप मुख्याधिकारी व्ही. बी. दातीर व बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता चारूदत्त दंडवते यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गिरमे करीत आहेत.