वैनगंगा नदी पात्रातील धरणनजिक मासेमारी करण्यास बंदी

0
20

सिहोरा-धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदी पात्रातील धरणनजिक मासेमारी करण्यास बंदी घालण्यास आली आहे. यामुळे मांडवी गावातील ३५ ढिवर समाज बांधवाचे कुटूंब अडचणीत आलेली आहेत. यात जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याची ओरड गावात सुरू झाली आहे.

तिरोडा तालुक्यातील अदानी विज प्रकल्प आणि धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदीवर ४५० कोटी खर्चून धरण बांधकाम करण्यात आले आहे. या धरणाची पाणी संचय पातळी २६०.०० मिटर आहे. यंदा ६.५० मिटर धरणात पाणी साठवणूक करण्यात येत आहे. यामुळे नदी पात्रात १८ कि़मी. पर्यंत पाणी विस्तारलेले आहे. नदी काठावरील गावे आणि शेत शिवारात पाणी शिरत असल्याने धरणाचे गेट उघडण्यात येत आहेत. यामुळे पाण्याचा प्रवाह दाब उर्ध्व भागात वाढत आहे. या धरण बांधकामाच्या पुढे मांडवी गावाचे वास्तव्य आहे. यामुळे धरण लगत या गावातील ढिवर समाजातील बांधव मासेमारी करीत आहेत. मासेमारी त्यांचे उपजिविकेचे साधन आहे. या व्यवसायावर ३५ कुटूंबियांचा उदरनिर्वाह आहे. परंतु बॅरेजनजीक गेल्या काही वर्षात अपघात झालेली असून यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे धरण नजीक प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. या परिसरात प्रवेश बंदी असणारे सुचना फलक लावण्यात आलेली आहे. दरम्यान धरण पासून ५०० मीटरपर्यंत नदी पात्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आल्याने ढिवर समाज बांधवावर रोजगारांची कुऱ्हाड कोसळली आहे. या समाजातील नागरिकांकडे शेती नाही. मासेमारी करणे हा एकमेव रोजगार आहे. या व्यवसायावर बंदी घालण्यात आल्याने उपासमारीचे संकट ओढावले आहे.

या परिसरात मासेमारी करीत असताना पोलीस तथा प्रशासनाची दडपशाही वाढली आहे. बॅरेजच्या उर्ध्व भागात प्रवेश बंदी असली तरी मासेमारी करण्यास मंजुरी देण्याची ओरड गावात आहे.

दरम्यान ५०० मीटर अंतरच्या पुढे नदी पात्रात मासेमारी करण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु या पात्रात पाणीच राहत नसल्याने मासेमारी अडचणींची ठरत आहे. या पात्रात मासोड्या सापडत नाहीत, असे गाऱ्हाणे ढिवर समाज बांधव मांडव आहेत. मासेमारी करण्यास बंदी घालण्यात येणारे पत्र मांडवी ग्रामपंचायत आणि सिहोरा पोलीस ठाण्यात प्राप्त झाले आहे. गोसीखुर्द डावा कालवा उपविभाग क्रमांक ५ तिरोडा या यंत्रणेने हा पत्रव्यवहार केला आहे.

बंदी उठविण्यासाठी भंडाराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावे या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. शिष्टमंडळात सरपंच सहादेव ढबाले, रमेश नागपुरे, मनोज शेंडे, विनोद शेंडे, राधेश्याम नागपुरे, हरिचंद नागपुरे, राजु शेंडे, ईश्वर शेंडे, सुभाष मेश्राम, मानिक शेंडे, शालिक शेंडे, डिगांबर मेश्राम, भारत शेंडे, आशिक शेंडे, चुन्नीलाल नागपुरे, ताराचंद नागपुरे, रूपचंद मेश्राम यांचा समावेश होता.