गोंदियातील वाहतूक व्यवस्थेला लागणार शिस्त;नो पार्कींग झोन मध्ये जड वाहनांना प्रवेश बंदी

0
18

गोंदिया,दि.१० : गोंदिया शहराच्या मध्यभागी भाजीबाजार व प्रमुख बाजारपेठ असल्याने त्या भागात दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन होत आहे. औद्योगिक विकासामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. त्यामानाने रस्ते मात्र अरुंद व जुनेच आहे. मुख्य बाजारपेठेत जड वाहने, माल वाहतूक वाहने, चारचाकी वाहने, दुचाकी वाहने, हातठेले, रिक्षा आदींमुळे रस्त्याच्या ठिकठिकाणी वाहनांची वारंवार कोंडी निर्माण होत आहे. सामान्य जनतेला यामुळे होणारी अडचण व सुरक्षीततेच्या दृष्टीने वाहतूक कोंडीचा प्रश्न व पार्कींगचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे यावर मात करण्यासाठी पोलीस विभागाने गोंदिया शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकक्षेत यादृष्टीने एक अधिसूचना लागू केली आहे.
गोंदिया शहरातील सर्व बसस्थानके व बसथांबे यांच्या प्रवेशद्वारापासून २०० मीटर अंतरावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी नो पार्कींग झोन क्षेत्र यापुढेही कायम ठेवण्यात येत आहे. जयस्तंभ चौक ते रेल्वे क्रॉसींग मरारटोली या राज्य महामार्गावरील तसेच जयस्तंभ चौक ते फुलचूर नाका या राज्य महामार्गावरील दोन्ही बाजूस जड मालवाहतूक वाहनांसाठी जाहीर केलेले नो पार्कींग झोन यापुढेही कायम राहील.
जड वाहनांना प्रवेश बंदी, चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी, दुचाकी वाहनांसाठी सम/विषम तारखांना पार्कींग, दुचाकी वाहनांसाठी वन साईड पार्कींग, जड वाहनांसाठी पार्कींग झोन, चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पार्कींग झोन यासाठी वाहतूक नियमावली निश्चित करण्यात आली आहे.
सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत जड वाहनांना प्रवेश बंदी राहील. रस्ता क्र.१ : गुरुनानक गेट ते गांधी चौक-चांदणी चौक-राजस्थान कन्या विद्यालय पर्यंतचा पूर्व भाग, रस्ता क्र.२ : छत्रपती शिवाजी चौक-गांधी चौक-गोरेलाल चौक- श्री टॉकीज चौक पर्यंतचा दक्षिण उत्तर मार्ग, रस्ता क्र.३ : महाराणा प्रताप चौक-दिपक ट्रान्सपोर्टकडे जाणारा दक्षिण उत्तर मार्ग, रस्ता क्र.४ : कृषि उत्पन्न बाजार समिती-चांदणी चौक-दुर्गा चौक-रेल्वे लोखंडी सिडीपर्यंतचा दक्षिण उत्तर मार्ग, रस्ता क्र.५ : भारतमाता चौक-गोयल चौक-सब्जीमंडीकडे जाणारा पश्चिम पूर्व मार्ग, रस्ता क्र.६ : श्री बाबुजी बजरंग व्यायाम शाळा चौक-मारवाडी चौकपर्यंत जाणारा पश्चिम पूर्व मार्ग, रस्ता क्र.७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक-सुभाष शाळेकडे जाणारा पूर्व पश्चिम मार्ग, रस्ता क्र.८ : पं.जवाहरलाल नेहरु चौक-दुर्गा चौकपर्यंत जाणारा पूर्व पश्चिम मार्ग, रस्ता क्र.९ : कुडवा नाका-धोटेबंधू विज्ञान महाविद्यालय-एन.एम.डी.कॉलेज पाल चौकपर्यंत जाणारा उत्तर दक्षिण मार्ग, रस्ता क्र.९ अ : शक्ती चौक-गुरुद्वारा गुजराती हायस्कूल पाल चौकपर्यंत जाणारा पूर्व पश्चिम मार्ग या मार्गावर प्रवेश बंदी राहील.
जड वाहनांना ये-जा करण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये गुरुनानक गेट-मोदी पेट्रोलपंप-शिवाजी चौक-महाराणा प्रताप चौक-कृषि उत्पन्न बाजार समिती-सिंधी हायस्कूल-एफसीआयकडे जाणारा पूर्व पश्चिम मार्ग आणि कुडवा नाका-अवंती चौक रेल्वे क्रॉसींग-मरारटोली चौक-शक्ती चौक-रेल्वे स्टेशन-रेल्वे मालधक्का या मार्गाचा समावेश आहे.
चारचाकी वाहनांना सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये रस्ता क्र.१० वरील गणेश क्लॉथ स्टोर्स-गोरेलाल चौक-श्री टॉकीज चौकपर्यंतचा उत्तर दक्षिण मार्ग (स्कूल बस,पोलीस,अग्नीशमन,रुग्वाहिका ही वाहने या प्रवेशबंदीतून वगळण्यात आली आहे). रस्ता क्र.११ वरील ॲक्सीस बँक-गोरेलाल चौक-पुरोहित स्वीट मार्ग-दुर्गा चौकपर्यंतचा पूर्व पश्चिम मार्ग याचा समावेश आहे. रेल्वे स्टेशनकडे जाण्या-येण्यासाठी गांधी प्रतिमा-चांदणी चौक-दुर्गा चौक-रेल्वे स्टेशन हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

दुचाकी वाहनांसाठी सम/विषम तारखांना पार्कींगची व्यवस्था निश्चित करण्यात आली असून रस्ता क्र.१२ : गांधी प्रतिमा-गोरेलाल चौक या मार्गावर सम तारखेस पूर्व बाजूस पार्कींग, विषम तारखेस पश्चिम बाजूस पार्कींग, रस्ता क्र.१३ : गोरेलाल चौक-ख्वाजा मस्जीद या मार्गावर सम तारखेस उत्तर बाजूस पार्कींग/विषम तारखेस दक्षिण बाजूस पार्कींग, रस्ता क्र.१४ : गोरेलाल चौक-दुर्गा चौक या मार्गावर सम तारखेस उत्तर बाजूस पार्कींग/विषम तारखेस दक्षिण बाजूस पार्कींग, रस्ता क्र.१५ : श्री टॉकीज-जैन मंदीर-फर्निचर दुकान या मार्गावर सम तारखेस पूर्व बाजूस पार्कींग/विषम तारखेस पश्चिम बाजूस पार्कींग राहील.
दुचाकी वाहनांसाठी वनसाईड पार्कींगची व्यवस्था करण्यात आली असून रस्ता क्र.१६ वरील तिरुपती गिफ्ट हाऊस-जैन बेकरी या मार्गावर पूर्व बाजूस वनसाईड पार्कींग, रस्ता क्र.१७ : वरील इओएस सिनेमागृह-डी.बी.सायंस कॉलेज मार्गावर पश्चिम बाजूस वनसाईड पार्कींगची व्यवस्था करण्यात आली असून जड वाहनांसाठी पार्कींग झोन रस्ता क्र.१८ वर फुलचूर नाका (रिलायन्स पेट्रोलपंप)-चुलोद नदी या मार्गावर उत्तर बाजूस पार्कींग, रस्ता क्र.१९ : फुलचूर नाका-आयटीआय या मार्गावर पश्चिम बाजूस पार्कींग, रस्ता क्र.२० : आयटीआय-पोलीस मुख्यालय कारंजा या मार्गावर पूर्व बाजूस पार्कींग.
चारचाकी वाहनांसाठी पे ॲन्ड पार्कची व्यवस्था निश्चित करण्यात आली असून पार्कींग झोन क्र.१ मध्ये गोंदिया शहर पोलीस स्टेशनच्या मागे नगरपरिषद पार्कींग झोन, पार्कींग झोन क्र.२ मध्ये एसबीआय बँक समोरील सुभाष स्कूल ग्राउंडवरील पार्कींग झोन, पार्कींग झोन क्र.३ मध्ये गोंदिया बालाघाट राज्य महामार्गावरील नविन उड्डाण पुलाच्या खाली पार्कींग झोन, दुचाकी वाहनांसाठी सुध्दा पे ॲन्ड पार्कची व्यवस्था निश्चित करण्यात आली असून पार्कींग झोन क्र.४ मध्ये अग्रसेन गेट-जसानी ऑटोमोबाईल-गोंदिया गॅस एजन्सी सेक्टरमधील पार्कींग झोन, पार्कींग झोन क्र.५ मध्ये दिल्ली हॉटेल-गोरेलाल चौक-दुर्गा चौक या सेक्टरमधील पार्कींग झोन, पार्कींग झोन क्र.६ मध्ये एसबीआय बँक समोरील सुभाष स्कूल ग्राउंडवरील पार्कींग झोन. अशाप्रकारची वाहतुकीची व्यवस्था ९ नोव्हेंबरपासून अस्तित्वात आली आहे. तरी वाहन चालक, वाहन मालकांनी या वाहतूक व्यवस्थेचे पालन करावे. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ यांनी एका अधिसूचनेद्वारे केले आहे.
०००००