मातृसेवा संघाच्या नविन वास्तुचे उद्घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते

0
17

नागपूर, दि. 10 : सामान्य माणसांपर्यंत परवडणाऱ्या आरोग्यसेवा पोहचविण्यासाठी सेवाभावी संस्थांचे जाळे उभारण्याची गरज असून या सेवाभावी संस्थांनी जनसामान्यांपर्यंत आरोग्यसेवा पोहचवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मातृसेवा संघाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन व पद्मश्री स्व. कमलाताई होस्पेट यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणानिमित्त कविवर्य सुरेश भट सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, ऊर्जा तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सर्चच्या प्रमुख डॉ. राणी बंग, मातृसेवा संघाच्या अध्यक्षा कांचनताई गडकरी,सचिव वैदेही भाटे, इरावती दाणी, डॉ. अरुणा बाभुळकर, डॉ. लता देशमुख, ज्योती बावनकुळे, जाई जोग उपस्थित होते.

कमलाताईंनी मातृसेवा संघाच्या उभारणीद्वारे आरोग्यक्षेत्रातील कामाची सुरुवात अतिशय आव्हानात्मक काळात केली असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,केवळ मातृत्वाच्या सेवेसाठीच कमलाताईंनी कामाची उभारणी केली. मातृसेवा संघाच्या कामाचा आज वटवृक्ष झालेला दिसतो. मात्र, या कामामागे अनेकांची मेहनत व योगदान आहे. व्रतस्थ वृत्तीमुळेच हे काम उभे राहिलेले दिसते. मातृसेवा संघाच्या नव्या वास्तूद्वारे अनेक गरजूंना आरोग्यसेवा मिळतील. मातृसेवा संघासारख्या विविध सेवाभावी संस्थांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाहीही श्री. फडणवीस यांनी दिली.आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान वाढते आहे. आरोग्य सेवांचा विस्तारही होत आहे. या आरोग्यसेवा सामान्य माणसांना परवडणाऱ्या होतील यावर भर देण्याची गरज आहे. सेवाभावी संस्थाच सामान्यांपर्यंत सेवाभावी वृत्तीने आरोग्यसेवा पोहचवू शकतात. सेवाभावी संस्थांच्या पाठीशी  आश्रयदाते व दानशूर व्यक्तींनी खंबीरपणे उभे राहावे. अशा पद्धतीच्या व्यवस्थेतून सामान्य माणसांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा नक्कीच पोहचविता येतील. असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, कमलाताईंनी सेवाभावी वृत्तीने आपल्या कामाची उभारणी केली. समाजात अनेकजण सेवाभावाने काम करीत असतात. अशांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. मातृसेवा संघासारख्या विविध सेवाभावी संस्थांची समाजाला नितांत गरज आहे. सेवाभावी संस्थांनी गरिबांपर्यंत सेवा पोहचवावी. आजाराचा प्रतिबंध करणे गरजेचे असल्याने नागपूर शहर व जिल्ह्यात महिलांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.  आगामी काळात विविध क्षेत्रात लोकसहभागातून कामे उभारण्यावर भर द्यावा लागेल. गंगा नदीवर उभारण्यात येणारे विविध घाट व त्यांचे सुशोभीकरण यासाठीही लोकसहभागावरच भर देण्यात येत असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कमलाताईंचे महिला आरोग्य क्षेत्रातील काम प्रेरणादायी आहे. नागपूर जिल्ह्यात महिलांच्या आरोग्यासंदर्भात विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.डॉ. राणी बंग म्हणाल्या, कमलाताईंमध्ये सेवा, त्याग, समर्पण हे गुण होते. त्या जगतजननी  होत्या. महिलांच्या आरोग्यासाठी कमलाताईंनी दिलेले योगदान मोठे असून त्यांच्या या कामाची महती सर्वांपर्यंत पोहचविली पाहिजे. मातामृत्यूचे प्रमाण पूर्वी मोठ्या प्रमाणावर होते. मातृसेवा संघाच्या कामामुळे मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यास यश मिळाले आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मातृसेवा संघासारख्या सेवाभावी संस्थांच्या कामाची जवळून ओळख करुन देण्यात यावी. महिला आरोग्याच्या क्षेत्रात विविध प्रकारचे कर्करोग प्रतिबंधन, वंध्यत्व निवारण तसेच विवाहपूर्व समुपदेशन यावरही विशेष भर देण्याची गरज असल्याचे डॉ. बंग यांनी सांगितले.यावेळी मातृसेवा संघाच्या विविध आश्रयदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात कांचन गडकरी म्हणाल्या, कमलाताईंनी सेवेची परंपरा घालून दिली. महिलांना केंद्रस्थानी मानूनच संस्थेची वाटचाल सुरु आहे. संस्थेची नवीन इमारत गरजूंच्या सेवेत रुजू होत आहे. महिला आरोग्य व आहारासंदर्भात काळजी घेण्यासाठी विशेष विभाग लवकरच सुरु करण्यात येईल, असेही श्रीमती गडकरी यांनी सांगितले.