बाबासाहेबांच्या विचारांची ओबीसी समाजाला खरी गरज-डॉ.बोपचे

0
14

सडक अर्जुनी,दि.२७: डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोसिअल फाऊंडेशन गोंदियाच्यावतीने संविधान दिनाचे औचित्य साधून येथील दुर्गाा चौकात प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संविधान दिन कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक व माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते आणि त्यांनी भारतीय संविधान लिहिले नसते तर देशाची स्थिती कशी असती याचा विचार न केलेला बरा. आज ओबीसी, एससी, एसटी या मागासवर्गीय समाजांनी डॉ.आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याची नितांत आवश्यकता आहे. विशेष म्हणजे संविधान निर्माण करताना या देशातील बहुसंख्याने असलेल्या ओबीसी समाजाच्या कल्याणाचे हित त्यांनी आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी ठेवल्यामुळेच राज्यघटनेत ओबीसींच्या कल्याणासाठी सर्वप्रथम ३४० वे कलम लिहले. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी ३४१ वे कलम आणि अनुसूचित जातीसाठी ३४२ वे कलम लिहिले. ३४१ व ३४२ कलमांची अंमलबजावणी पंडीत नेहरुच्या सरकारने राजकीय दृष्टीकोन व बाबासहेबांच्या भितीमुळे संसदेत पारीत करुन केली. मात्र जेव्हा ओबीसींच्या ३४१ व्या कलमाला संसदेत पारीत करण्याची वेळ आली. तेव्हा नेहरुसह सरदार पटेलांपासून सगळ्यांनीच त्याचा विरोध केला आणि ते कलम मंजूर होऊ शकले नाही. याचे दु:ख बाबासाहेबांच्या मनात शेवटपर्यंत राहिले. आणि ओबीसींच्या हितासाठी त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाच देऊन टाकला. अशा या महानुभावांच्या त्यागाचे विचार ओबीसी समाजाला आत्मसात केल्याशिवाय खèया अर्थाने लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही असे विचार व्यक्त केले. डॉ. बोपचे पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षापासून ओबीसी समाज हळू-हळू जागृत होऊ लागला आहे. परंतु पाहिजे त्या प्रमाणात अद्यापही जागृत न झाल्यानेच ओबीसी विरोधी निर्णय केंद्र व राज्यातील सरकारे घेऊ लागले आहेत. या ओबीसीविरोधी सरकारांच्या विरोधात सर्वांनी संगठीत होण्याची गरज असल्याचे विचार त्यांनी व्यक्त केले. ओबीसी समाजासाठी तरतूद संविधानात केली नसती तर या समाजाची आज वाईट अवस्था झाली असती. ज्या समाजांनी डॉ.आंबेडकरांचे विचार आजही आत्मसात केले नाही तो समाज आजही मागासच असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रीकापुरे, आयोजक भाऊदास जांभुळकर, देवचंद तरोणे, बिरला गणवीर, राजू भगत, सुशील लाडे यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते. आयोजनासाठी सुमीत भालाधरे, शामसुंदर बन्सोड, निलकंठ फुल्लूके, सुकचरण राऊत, राजेश शहाारे, ईवरीस अंबादे, शैलेष साखरे, सुभाष कोटांगले, ज्योती जांभुळकर, लिला अंबादे, गौतमी बडोले, ज्योती बोरकर, सरिता वैद्य, रमेश भैसारे, वासुदेव शहारे, रत्नदीप फुल्लूके आदिंंनी सहकार्य केले. प्रबोधन पर कार्यक्रमानंतर मनोरंजनासाठी बाल गंर्धव मराठमोड्या लावणीचे कार्यक्रम सादर करण्यात आले.