दारुबंदीसाठी शिरूर ते मंत्रालय संघर्षयात्रा

0
10

शिरुर,दि.27(विशेष प्रतिनिधी)ः- वर्धा, गडचिरोली व चंद्रपूरच्या धर्तीवर शासनाने राज्यात संपूर्ण दारूबंदी जाहीर करावी, या प्रमुख मागणीसाठी येथील क्रांतिवीर प्रतिष्ठानच्या वतीने पाच जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यान शिरूर ते मंत्रालय, अशी संघर्षयात्रा काढण्यात येणार आहे. यानंतर १० जानेवारीपासून राज्य उत्पादन शुल्क आयुक्तालया समोर बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिली.
गेल्या वर्षी क्रांतिदिनी (९ आॅगस्ट) पाचंगे यांनी तालुक्यात ९१ ग्रामपंचायतीत ग्रामसभेत दारूबंदीचे ठराव घेण्यात आले. पंचायत समितीही या मोहिमेत सहभागी झाली. जिल्ह्यातही यामुळे १३०० ग्रामस्थांनी दारूबंदी व व्यसनमुक्तीचे ठराव केले. आता संपूर्ण राज्यात दारूबंदी व्हावी या मागणीसाठी संघर्षयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
शासनाचे दारूबंदी व व्यसनमुक्ती धोरण पाहता तसेच जागतिक दारू पिण्याचे परिणाम पाहता राज्यातील बिअरबार, परमिटरूम तसेच दारू पिण्याचे प्रमाण बेकायदा असल्याचे पाचंगे यांनी उत्पादक शुल्क आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जगभरात दारू पिण्याचे ठरवून दिलेले प्रमाण पाहता युनायटेड किंग्डम तसेच इतर देशांत अनुक्रमे १० ते १४ युनिट दर आठवडा असे आहे. राज्यात एका व्यक्तीला दर आठवडा १५०० मि.लि. दिलेले प्रमाण चुकीचे असल्याचे पाचंगे यांनी म्हटले आहे.शासनाने नागरिकांच्या मागणीनुसार त्या भागात दारूबंदी करावी तसेच ज्या तालुक्यातून (भागातून) दारूबंदीची मागणी नसेल तिथे तेथे मिलिमीटरप्रमाणे एकाच ठिकाणी पुरवठा केंद्र सुरू करावे, अशी मागणी पाचंगे यांनी केली आहे.मोक्का कायद्यांंतर्गत कारवाई होणे गरजेचे आहे. शासनाने गांभीर्याने न घेतल्यास कायदा हातात घेऊन उग्र आंदोलन करण्याचा इशारा पाचंगे यांनी दिला आहे.