वंचितांच्या उत्थानासाठी गांधी-आंबेडकरांचे योगदान महत्त्वाचे; प्रकाश आंबेडकर

0
14

वर्धा,दि.31 : महात्मा गांधी आणि बाबासाहेबांच्या कार्याचा विचार केल्यास दोघांचेही मिशन एकच होते. त्या काळात दोघांत वाद होता, पण संवाद कधीच थांबला नाही. शोषित, पीडित, वंचितांच्या उत्थानासाठीच दोघांनीही कार्य केले. म्हणूनच दोघांचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘गांधी आंबेडकर मुक्त चिंतन’ या विषयावर बोलताना केले.
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने महात्मा गांधी यांच्या ७० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी तर प्रमुख वक्ता म्हणून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, राजमोहन गांधी, पद्मश्री डॉ. गणेश देवी, आ. आशिष देशमुख, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, महाराष्ट्र भूदान मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ विरूळकर, मा.म. गडकरी, उषा गांधी व सरपंच रोशना जामलेकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे खादीची शाल, सूतमाळ व ग्रंथ देवून स्वागत करण्यात आले.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आज दलितांसह बहुजन वर्गात शक्तीसह चेतना निर्माण करण्याचे काम करावे लागेल. समाजातील कथीत ठेकेदारांच्या विरूद्ध वंचितांना उतरवावे लागेल. सज्जनाचे आंदोलन नाही म्हणून दुर्जनांची शक्ती वाढल्याचे प्रतिपादन न्या. धर्माधिकारी यांनी केले. गांधी आंबेडकरांचे आंदोलन अहिंसेवर आधारित होते. पुणे कराराच्या अनुषंगाने पुण्यात दोघांचा पुतळा उभारला पाहिजे. समाज परिवर्तनाचे प्रवासी बनून राष्ट्र निर्माणाचे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. गणेश देवी यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक जयवंत मठकर यांनी केले तर संचालन आणि आभार मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी मानले. प्रारंभी वैष्णव जन तो, हे भजन आनंद निकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. हे नम्रता के सागर, या प्रार्थनेन समारोप झाला. आश्रमाच्या इतिहासाची माहिती मार्गदर्शक संगिता चव्हाण यांनी दिली. स्वागत कामगार जयश्री पाटील व पांडुरंग थूल यांनी केले. बापूंना सर्वांनी उभे राहून आदरांजली वाहिली.