तूर खरेदी केंद्र सुरू करा-आ. फुके यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

0
7

भंडारा,दि.४:-भंडारा जिल्ह्यात तुरीचा पेरा बर्‍यापैकी असताना राज्य सरकारने सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रांच्या यादीतून भंडारा जिल्ह्याला वगळण्यात आले. त्यामुळे येथील शेतकर्‍यांना शासनाच्या आधारभूत भावाला मुकावे लागत आहे.त्यामुळे विधान परिषदेचे आ. परिणय फुके यांनी जिल्ह्यात तूर खरेदी केंद्र सुरू करावे, असे पत्र जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.
भंडारा जिल्ह्यात ‘घर तिथे तूर’ आणि ‘बांधी तिथे तूर’ या संकल्पनेनुसार तुरीचे उत्पादन घेतले जाते. शेतशिवार तथा नदीकाठावरही तुरीचे पिक होते. परंतु, भंडारा जिल्ह्यात तुरीचे उत्पादन होत नाही, अशी बाब पुढे करून या जिल्ह्यात तूर खरेदी केंद्र उघडण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना मातीमोल भावात तुरीची विक्र ी करावी लागत आहे. पूर्व विदर्भातील नागपूर व चंद्रपूर या दोनच जिल्ह्यात तूर खरेदी केंद्र सुरु झाले असून जेव्हा भंडारा जिल्ह्यातील शेतकरी नागपूर जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रावर गेले तेव्हा भंडारा जिल्ह्यातील सातबारा असल्याने तूर घेण्यास नकार देण्यात आला. शासनाने तूर पिकाला आधारभूत भाव ५ हजार ५५0 रुपये घोषित केला आहे. परंतु, खरेदी केंद्र नसल्याने शेतकर्‍यांना पडक्या दरात तूर विकावी लागत आहे.
आ. परिणय फुके यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून यावर्षी सुमारे २0 हजार क्विंटल तूर विकली जाणार असून प्रायोगिक तत्वावर तूर खरेदी केंद्र सुरु करावे, अशी सूचना केली आहे. याशिवाय काही स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा तूर खरेदी केंद्राच्या मागणीसाठी पुढे आले आहेत. जिल्हा परिषद सदस्या जया सोनकुसरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र देऊन तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात तूर खरेदी केंद्र सुरू झाल्यास शासनाच्या आधारभूत भावाचा फायदा शेतकर्‍यांना होण्याची चिन्हे आहेत.