Home विदर्भ कुष्ठरोग्यांनी जगातील आगळेवेगळे कार्य केले : डॉ आमटे

कुष्ठरोग्यांनी जगातील आगळेवेगळे कार्य केले : डॉ आमटे

0

वरोडा, ९ फेब्रुवारी
‘आनंदवन हा लोकांसाठी नव्हे, तर लोकांनी स्वत:साठी केलेला प्रयोग आहे. या दृष्टिकोनामुळेच आनंदवनातील कुष्ठरोग्यांनी जगातील आपले वेगळे कार्य करून स्वत:सोबत इतरांच्याही जीवनात आनंद निर्माण केला’, असे प्रतिपादन महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी केले.
आनंदवनातील श्रद्धावनात कर्मयोगी बाबा आमटे यांच्या समाधीजवळ बाबांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार, ९ फेब्रुवारीला आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
श्रद्धावनातील या कार्यक्रमाला डॉ. भारती आमटे, डॉ. विजय पोळ, पल्लवी आमटे, सुधाकर कडू, सदाशिव ताजने, आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मुकूंद पुसदेकर, जि. प. विद्यालयाच्या गीता पांडे, आनंदवन कृषी तंत्र निकेतनच्या प्राचार्य देशमुख, आनंद मुकबधिर विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व आनंदवन परिवारातील सदस्य उपस्थित होते.
कर्मयोगी बाबा आमटे यांचे प्रथम सहकारी नारायण मरस्कोल्हे व रावसाहेब शिंदे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बाबांच्या समाधीस्थळाजवळ वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षाच्या संगोपनाची दखल वनविभाग घेणार आहे, हे विशेष. याप्रसंगी वृंदा पानसे व सायली पानसे यांनी भक्तीपर गीते सादर केली.
केंद्रीय रसायन मंत्री हंसराज अहिर यांनी श्रद्धावनातील बाबा आमटे यांच्या समाधीस्थळाला भेट दिली व समाधीवर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, संजय देवतळे, ओम मांडवकर, रवी कष्टी, विजय मोकाशी, डॉ. सुनील चांगले, राहुल सराफ, राजू गायकवाड, विलास गयनेवार आदी भाजपा नेते उपस्थित होते.

Exit mobile version