आष्टी येथील पेपरमिल सुरू करा

0
4

आष्टी दि.१४ : : येथील पेपरमिलचे उत्पादन जून २०१६ पासून बंद असल्याने पेपरमिलमधील स्थायी, अस्थायी कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. सदर पेपरमिलचे उत्पादन त्वरित सुरू करून थकीत वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी पेपरमिलच्या कामगारांनी खा. अशोक नेते यांच्याकडे केली. या संदर्भात त्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, मार्च ते मे २०१६ या तीन महिन्याचे थकीत वेतन अदा करण्यात यावे, १९ जून २०१३ च्या आंदोलनादरम्यान मिलमधील ४३ कामगारांवर न्यायालयात खटला सुरू आहे. पेपरमिल व्यवस्थापनाकडून सदर खटला मागे घेण्यात यावा, २० वर्षांपासून काम करीत असलेल्या कंत्राटी कामगारांना रोजगार देण्यास प्राधान्य द्यावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यावर खा. अशोक नेते यांनी येत्या दोन तीन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक लावून चर्चेतून तोडगा काढण्यात येईल, तोडगा न निघाल्यास कंपनी मालकाला केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयालयापुढे पाचारण करून समस्या मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा मजदूर संघाचे सहसचिव गजानन किरणापुरे, राजनाथ कुसवा, सचिव भाष्कर राऊत, अनंत प्रधान मंगलमूर्ती निनावे, विनायक जंगमवार उपस्थित होते