जातींच्या संघटना जातीतील उच्चभ्रूंचे हितसंवर्धन करतात, गरिबांचे नाही!

0
14

अमरावती,दि.03ः- लोकायत विचारमंच,नांदेड द्वारा ‘जागतिकीकरण : भारतीय शेती व जातिव्यवस्था’ या विषयावर आयोजित तिसरी विवेक जागर परिषद अमरावती येथे मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात संपन्न झाली. तिचे बीजभाषण ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह. साळुंखे यांनी केले.
ही परिषद एकूण तीन सत्रात झाली असून त्यातील दुसर्‍या सत्रात जातवास्तव आणि जातिअंताचा प्रश्न या विषयावर बोलताना अभ्यासक डॉ.दिलीप चव्हाण म्हणाले की, भांडवली शिक्षण व्यवस्थेच्या आधारे आपण जातिव्यस्थेचे योग्य असे आकलन करून घेऊ शकत नाही. ते समजून घेण्यासाठी जातिव्यवस्थेवर झालेले वाद-विवाद बारकाईने समजून घेणे आवश्यक आहे. समाजात कुठलीही सामाजिक व्यवस्था ही एकटी आणि सुटेपणाने अस्तित्वात नसते, तर त्या-त्या प्रदेशातील वेगवेगळ्या इतर सामाजिक व्यवस्थांसोबत ती कार्यरत असते. भारतामध्ये जातिव्यवस्थाही पुरुषप्रधानता आणि वर्ग या विषमतेच्या इतर व्यवस्थांसोबत कार्यान्वित आहेत. त्या एकमेकींना बळकटी देतात. यातूनच समाजात शोषणाची बहुपदरी व्यवस्था आकराला येते. कॉ. शरद् पाटील यांनी वर्तमान भारतातील शोषण व्यवस्थेचे वास्तव हे जात, वर्ग आणि स्त्रियांचे दास्य यांवर आधारित असल्याचे दर्शविले आहे. त्यामुळे भारतातील जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी जातीचा वर्ग आणि पितृसत्तेशी असणारा संबंध आपण समजून घेतला पाहिजे. तरच जातीचे वास्तव आपणास योग्य पद्धतीने आकलन करून घेता येईल व तिचे निर्मूलन करण्याच्या दिशेने आपणास जाता येईल. जातिव्यवस्थाअंताची क्रांती ही भांडवलदारी क्रांती आहे, ती समाजवादी क्रांती नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. अन्यथा आकलनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. कुठल्याही जातीचे संघटन हे त्या त्या जातीतील प्रस्थापित ताब्यात घेतात. जातींच्या संघटनाचा इतिहास बघितल्यास हे आपल्याला दर्शविते. जातीचे संघटन अपरिहार्यपणे त्या त्या जातीतील उच्चभ्रू प्रभावित करतात. आणि त्या त्या जातीतील गरीब हे आपल्या जातीला जातीनिष्ठेने बांधलेले असतात. वर्तमान काळात जातींतर्गत असणार्‍या वर्गभेद समोर आणणे आवश्यक आहे. जाती संघटन हे जातींअंताकडे जाऊ शकत नाही. याला पर्याय म्हणून वेगवेगळ्या जातीतील गरिबांना एकत्रित करणे त्यांना अस्तित्वाचे भान देणे आवश्यक आहे. त्यातूनच जातींचे निर्मुलन होऊ शकेल, आणि भारतीय समाजाला घेरून असणार्‍या विषमतेचा व त्यातून निर्माण होणार्‍या सामाजिक संघषार्ला नष्ट करता येईल. याप्रसंगी इतिहास अभ्यासक डॉ.उमेश बगाडे विचारमंचावर उपस्थित होते.
दुसर्‍या सत्रात डॉ.उमेश बगाडे बोलताना म्हणाले, धर्म, इतिहास यांच्या भ्रामक आणि खोट्या चौकटीत शेतकर्‍यांना अडकवून त्यांच्या मुख्य प्रश्नांवरून विचलित करण्यात येते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची व धमार्ची प्रतिगामी संगती लावून शेतकर्‍यांचे शोषण प्रस्थापित व्यवस्था वाढवले आहे. विषमता वाढवण्यासाठी हत्यार म्हणून भारतातील प्रस्थापित शोषक जातवर्ग वापरतो, ही बाब आपण बदलली पाहिजे. शेतकर्‍यांनी हातातील हत्यार होणे टाळले पाहिजे. जातीने आपल्या विचार करण्याच्या पद्धतीला असंवेदनशील बनवले आहे. जात स्वीकारण्यातून व्यक्ती गुलाम बनवतो, त्याचे शोषण वाढते. आपण कुलीन आहोत, हा भाव जपला की आपल्याच घरातील स्त्रियांना आपण शालीनतेच्या शोषणात बंदिस्त करतो, हे सांगायला कुणी ब्राह्मण येत नाही. तर आपल्याला जातीच्या श्रेष्ठत्वमुळे ते घडते. तुम्ही जेव्हा ब्राह्मणाला दोष देता तेव्हा स्वत:च्या अन्यायकारक वर्तनाबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. जातीची संरचना गुलामची आणि अहंकाराची आहे. त्यामुळे एकीकडे शेतकरी स्वत:ला श्रेष्ठ मानून स्वत:च्या घरातील स्त्रियांचे दास्यत्व राबवतात तर दुसरीकडे आपल्याहून निम्न मानल्या गेलेल्या जातीतील व्यक्ती बद्दल उपेक्षितपणे वागतात. तर आपल्याहून श्रेष्ठ जातीय लोकांसमोर दिन लाचार बनतात,या चक्रव्यूहातून शेतकर्‍यांना मुक्त होण्यासाठी शेतकर्‍यांनी जातिमुक्त झाले पाहिजे.

तिसर्‍या सत्रात चंद्रकांत वानखडे यांनी शेतकरी आत्महत्येचे मूळ शासकीय धोरणांमध्ये कसे आहे, याबाबत विवेचन केले. तर संजय आवटे यांनी प्रसारमाध्यमांद्वारे जातिव्यवस्थेचे बळकटीकरण वर्तमान काळात कसे घडत आहे, याविषयी अनुभवावर आधारित मांडणी केली. यावेळी अक्षरगाथा नियतकालिकाच्या परिषदेच्या विषयावरील विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. सदर परिषदेचा मोठय़ा संख्येने महाराष्ट्रातील अभ्यासक, संशोधक व कार्यकर्ते उपस्थित होतेत होते.