नागपूर,दि.3ः-लग्नास नकार दिल्याच्या कारणातून नात्यातील युवकाने एका युवतीला चेहर्यावर अँसिड फेकण्याची धमकी दिली. तो काही दिवसापासून युवतीला त्रास देत होता. अखेर कंटाळून २७ वर्षीय पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे. अतुल अशोक घोंगडे (२९, रा. इसासनी, हिंगणा) असे आरोपीचे नाव आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याचा एमसीआर देऊन कारागृहात रवानगी केली.
पोलिस सूत्रांनुसार, अतुल सुशिक्षित आहे आणि चांगल्या कंपनीत एमआर आहे. कोराडी ठाण्यांतर्गत राहणारी पीडिता त्याच्या नात्यात आहे. दोघांमध्ये मागील ६ वर्षांपासून मैत्री होती. मागील काही महिन्यांपासून अतुल तिला लग्नाची मागणी घालत होता, मात्र युवतीची त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा नव्हती. यामुळे तिने लग्नास नकार दिला आणि त्याला टाळण्यास सुरुवात केली. यामुळे संतापलेला अतुल तिला त्रास देऊ लागला. सतत तिचा पाठलाग करून फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता. दरम्यान, युवतीचा दुसर्या तरुणासोबत साक्षगंध झाला. अतुलने त्या तरुणाकडे पीडितेची बदनामी केली आणि लग्न तोडले. इतकेच नाही तर तो पीडितेच्या घरी पोहोचला. तिच्याशी ईल कृत्य केले. लग्न न केल्यास चेहर्यावर अँसिड फेकण्याची धमकी दिली. सोबतच स्वत:ही आत्महत्या करण्याची धमकी दिली. युवती आणि तिचे कुटुंबीय याप्रकाराला कंटाळले होते. बुधवारी कुटुंबीयांसह पीडितेने कोराडी ठाण्यात तक्रार दाखल केली. विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून पोलिसांनी अतुलला अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याचा एमसीआर देऊन कारागृहात रवानगी केली. पुढील तपास सुरू आहे.





