पंजाबच्या धर्तीवर विदर्भात ‘सिट्रस इस्टेट’, अर्थसंकल्पात घोषणा

0
11

नागपूर,दि.10 – संत्रा, मोसंबीचे उत्पादन वाढविण्यापासून ते विक्रीपर्यंतची व्यवस्था विकसित करण्यासाठी पंजाबच्या धर्तीवर विदर्भातील नागपूर, अमरावती व अकोला हा परिसर ‘सिट्रस इस्टेट’ म्हणून विकसित केला जाईल. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात तशी घोषणा केली. यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
पंजाबमध्ये ६० हजार हेक्टरवर संत्र्याच्या किन्नो जातीची लागवड आहे. तेथे प्रति हेक्टर २१ टन उत्पादन होते. विदर्भात मात्र ही उत्पादकता ६ ते ७ टन आहे. पंजाबमध्ये ‘सिट्रस इस्टेट’च्या माध्यमातून संत्रा उत्पादकांना संत्रा कलम तयार करण्यापासून ते विक्री व्यवस्थापनापर्यंत मार्गदर्शन केले जाते, मदत दिली जाते. त्याच धर्तीवर विदर्भातही मदत व्हावी म्हणून गेल्या सात-आठ वर्षांपासून महाआॅरेंज प्रयत्न करीत आहे.
संत्रा लागवड असलेल्या जिल्ह्यांमध्ये संत्र्यांच्या दर्जेदार कलमांची निर्मिती करणे, नवीन जाती विकसित करणे, रोग प्रतिबंधक करण्याविषयी मार्गदर्शन, चांगल्या उच्च दर्जाच्या फळांची निर्मिती, त्याचे ग्रेडिंग व कोटिंग, विक्री व्यवस्थापनास मार्गदर्शन ही जबाबदारी ‘सिट्रस इस्टेट’ कडून पार पाडली जाईल. यात शासनाचे सर्वतोपरी सहकार्य असेल. त्यामुळे संत्र्याचा दर्जा व उत्पादनातही वाढ होईल.