गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी वैनगंगा नदीला सोडावे-नगराध्यक्ष पिपरे

0
7

गडचिरोली,दि.06ः-यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी मोठय़ा प्रमाणात कमी झाली असून त्याचा फटका गडचिरोली शहरातील नागरिकांना बसत आहे. उन्हाळा संपायला जवळपास दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असून या कालावधीत जलसंकट तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
गडचिरोली शहराला वैनगंगा नदीच्या पात्रातून पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी नगर परिषदेने नदीपात्रात इनटेकवेल खोदली असून त्याच्या सभोवताल रेतीचा बंधारा बांधण्यात आालेला आहे. या विहिरीला पाणी येण्यासाठी दोन व्हॉल बसविण्यात आलेले आहेत. विहीर खोदकाम केल्यानंतर दोन्ही व्हॉल पाण्यात बुडून होते. मात्र, उन्हाळा सुरू झाल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे एक व्हॉल उघड्यावर पडले आहे. त्यामुळे पाणी उपसा करणारे पंप एक तास बंद ठेवावे लागत असल्याने पाण्याच्या पूर्णपणे भरत नाही. त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठय़ावर होत आहे. नागरिकांना दिवसातून एकच वेळा पाणीपुरवठा करण्यात येते. भविष्यात दुसरा व्हॉल उघड्यावर पडण्याची शक्यता असून पाण्याची भिषण समस्या निर्माण होणार आहे.
नगर परिषदेला पाण्याचे दुसरे कोणतेही पर्यायी स्त्रोत नसल्यामुळे, वैनगंगा नदीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. वैनगंगा नदीच्या उत्तर दिशेला गोसेखुर्द प्रकल्प असून पाणी अडविलेले आहे. त्यामुळे वैनगंगा नदीतील पाण्याचा प्रवाह बर्‍याच दिवसापूर्वी बंद झालेला आहे. तसेच वैनगंगा नदीत इतरही जल उपसा सिंचन प्रकल्प कार्यान्यिात आहेत. त्यामुळे पाण्याची पातळली खालावली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना अत्यल्प पाणीपुरवठा केल्या जात आहे. ही पाण्याची भिषण टंचाईल लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना म्हणून गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी वैनगंगा नदीला सोडण्यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावे, अशी मागणी नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी जिल्हाधिकारी कडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.