भाजपच्या पदाधिकार्‍यांमध्ये संचारली गुंडगिरी- राकेश ठाकुर यांचा आरोप

0
16

गोंदिया,दि.06ः-विकासकामांचे श्रेय घेणे हे गैर नाही. येथील गोपुरीच्या विकासासाठी आमदार गोपालदास अग्रवाल व आमदार फुके यांच्या पाठपुराव्याने १ कोटी रुपये मंजूर झाले. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आपआपल्या परीने श्रेय घेऊ लागले. मात्र, भाजपचे नगरपरिषदेचे उपाध्यक्ष यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून नव्या वादाला तोंड फोडले. यावर पक्षातील काही पदाधिकार्‍यांनी उपाध्यक्षाच्या सोबतीला जाऊन भाजपच्या पदाधिकार्‍यांमध्ये एकप्रकारे गुंडगिरी संचारल्याचा परिचय दिल्याचा आरोप काँग्रेसचे माडी नगरसेवक राकेश ठाकुरसह इतर कार्यकर्त्यांनी पत्रपरिषदेत केला.पत्रपरिषदेला  राकेश ठाकुर, चिकु अग्रवाल,नगरसेवक सुनिल भालेराव, देवा रुसे, पराग अग्रवाल, आलोक मोहंती, संदिप ठाकुर, नफिस सिद्दीकी, मंटू पुरोहित, हरिष तुरसकर, संदिप रहांगडाले, राकेश जायस्वाल, राजू तिवारी, सुशिल ठवरे,राजू डोंगरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
ते म्हणाले की, सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून विकासकामांच्या श्रेयाला घेवून अनूचित टिप्पणी करण्यात येत आहे.एका मजकूरावर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष शिव शर्मा यांनी आमदार अग्रवाल यांच्या कुटुंबीयांविरोधात खालच्या पातळीवर जाऊन टिप्पणी केली. यामुळे काँगे्रस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या. पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी जर खालच्या स्तरावर जाऊन असे कार्य करीत असेल तर पक्षाने त्यांच्यावर कारवाई अपेक्षित असताना पक्षाचे पदाधिकारी मात्र त्यांची पाठराखण करण्यात पुढाकार घेतात. एवढेच नव्हे तर पोलिस ठाण्यात जाऊन दबावतंत्राचा वापर करतात.आपल्यावर एकही गुन्हा दाखल नसून उलट शर्मा यांच्यावर भादंवि कलम ३०७, ३५३ यासारखे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये त्यांच्या पक्षातील काही पदाधिकार्‍यांचाही समावेश आहे. हे सर्वज्ञात आहे. म्हणजेच, पक्षाचे पदाधिकारी गुंडगिरीला शह देत आहेत. भाजप हा पक्ष गुंडांचा पक्ष आहे काय? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.