एका वर्षात घोगराला आदर्श बनविणार- मनोज डोंगरे

0
13

घोगरा येथे ग्राम स्वराज्य अभियान सभा
गोंदिया,दि.१८ : घोगरा या गावातील ग्रामस्थांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ न मिळाल्यामुळे या गावातील गरीब लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गाव अविकसीत राहिले आहे. ग्राम स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून गावातील सर्व कुटूंबांना केंद्र सरकारच्या सात योजनांचा लाभ देवून एका वर्षाच्या आत विविध विकास कामे करुन घोगराला आदर्श बनविणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांनी केले.
१६ एप्रिल रोजी तिरोडा तालुक्यातील घोगरा येथे ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत आयडीबीआय शाखा मुंडीकोटा यांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून श्री.डोंगरे बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच गीता देव्हारे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आयडीबीआय बँकेच्या वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक वैशाली नेमलेकर, अग्रणी जिल्हा प्रबंधक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापक आनंद वासनिक, बँक ऑफ इंडियाचे श्री.पहिरे, ग्रामपंचायत सदस्य श्री.बिसेन, श्री.तिडके यांची उपस्थिती होती.
श्री.डोंगरे पुढे म्हणाले, गावात योजनांच्या लाभातून परिवर्तन झाले पाहिजे. लोकप्रतिनिधी व यंत्रणांची या गावाच्या विकासाच्या बाबतीत जबाबदारी वाढली आहे. गावाच्या विकासात युवावर्ग व महिलांचा सहभाग असला पाहिजे. ग्रामस्थांनी योजनांची माहिती जाणून घेवून लाभ घेतला पाहिजे असे ते म्हणाले.
श्रीमती नेमलेकर म्हणाल्या, घोगरा या गावातील १८ वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीने बँकेमध्ये आपले खाते उघडले पाहिजे. शासनाच्या अनेक योजना आहेत त्या योजनांचे अनुदान थेट खात्यामध्ये जमा होणार आहे. अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्याच्या थेट खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे बँक खाते असणे आवश्यक आहे. बँक खाते असल्यामुळे कामात पारदर्शकता येण्यास मदत होईल. ज्यांच्याकडे रुपी कार्ड आहे त्यांनी ते ॲक्टीव्ह करुन घ्यावे. यासाठी बँकेशी संपर्क करावा असे आवाहनही त्यांनी केले.
सरपंच श्रीमती देव्हारे म्हणाल्या, गावातील प्रत्येक व्यक्तीने बँक खाते उघडावे त्याशिवाय शासनाच्या योजनांचा भविष्यात लाभ मिळणार नाही. मागास असलेले हे गाव विकसीत करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. प्रत्येकाने आपले घर, परिसर व गाव स्वच्छ ठेवावा. गावाच्या विकासात युवावर्ग व महिलांची भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.सिल्हारे म्हणाले, जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. बँकेशी संबंधित असलेली ग्रामस्थांची कामे वेळेवर झाली पाहिजे. १४ एप्रिल ते ५ मे पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या ग्राम स्वराज्य अभियानातून या गावातील प्रत्येक कुटूंबाला केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.जागरे म्हणाले, बँक खाते उघडणे किती महत्वाचे आहे हे लक्षात येईल. विविध योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. नाबार्डमार्फत गावाच्या विकासाच्या तसेच वैयक्तीक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घेतला पाहिजे असे ते म्हणाले.
श्री.खडसे म्हणाले, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य योजना), उजाला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि मिशन इंद्रधनुष्य या केंद्र सरकारच्या सात योजनांची या गावामध्ये ग्राम स्वराज्य अभियानादरम्यान प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी या योजनांसह अन्य केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेवून आपला आर्थिक, सामाजिक विकास करावा असे त्यांनी सांगितले.
श्री.वासनिक म्हणाले, स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था ही बँक ऑफ इंडिया मार्फत चालविण्यात येते. बेरोजगार सुशिक्षीत युवक-युवतींना अल्प कालावधीचे या संस्थेतून प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे तो स्वावलंबी होण्यास मदत करण्यात येते. सर्व प्रशिक्षण हे मोफत दिले जात असून प्रशिक्षणानंतर कर्ज उपलब्ध करुन देण्यास बँक ऑफ इंडिया मार्फत पाठपुरावा करीत येत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.पहिरे यांनी या अभियानाचा उद्देश विशद केला. प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याबाबतची विस्तृत माहिती उपस्थित गावकऱ्यांना देवून या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेमध्ये खाते काढणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
यावेळी पंतप्रधानांची महत्वाकांक्षी प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनेचा जास्तीत जास्त घोगरा गावात प्रचार-प्रसार करण्याच्या दृष्टीने तसेच जास्तीत जास्त व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रक व पॉम्पलेट्सचे वितरण अग्रणी जिल्हा प्रबंधक श्री.सिल्हारे यांनी सरपंच श्रीमती देव्हारे यांना केले. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात या योजनेचे प्रचार-प्रसार करण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाचे संचालन मुंडीकोटा आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक सुदेश दहिवले यांनी केले. उपस्थितांचे आभार ज्ञानदेव चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला घोगरा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.