तलाव खोलीकरणाच्या कामावर मजुराचा मृत्यू

0
7

गोंदिया,दि.28ः-दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत लोहारा येथे वन विभागाच्या जागेवरील जुन्या तलावाचे खोलीकरणाचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत सुरू करण्यात आले. उन्हात काम करत असलेल्या ५९ वर्षीय मजुराची अचानक प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना काल (दि.२६) दुपारी ११.३0 वाजता सुमारास घडली. अंगदलाल हगरु नागपुरे (५९) रा. लोहारा असे मृत मजुराचे नाव आहे. मजुराच्या अचानक झालेल्या मृत्यूला घेऊन ग्रामस्थांनी अडचणीत आलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.
तालुक्यातील लोहारा येथे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्ता बांधकाम व तलाव खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले. यातच मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या रस्ता बांधकाम पूर्ण झाल्यानंतर (ता.२६) पुन्हा वन विभागाच्या जागेवर असलेल्या जुन्या तलावाचे खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले. यात ९२ मजूर काम करीत होते. दुपारी ११.३0 वाजता सुमारास अंगदलाल हगरु नागपुरे (५९) रा. लोहारा हा काम करत असताना बेशुद्ध होवून खाली पडला. त्याला उपचाराकरीता अत्यवस्थेत गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आल. दरम्यान, डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. रोहय़ोच्या कामावर अचानक झालेल्या मृत्यूला घेवून लोहारावासीयांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. या घटनेची नोंद गोंदिया शहर ठाण्यात करण्यात आली आहे.