इर्री ग्रामपंचायतला १२ लाखांचा दंड

0
7

गोंदिया,दि.26 : रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या पांदन रस्त्यावर टाकण्यात आलेले मुरूम इर्री ग्रामपंचायतच्या अंगलट आले आहे. नामंजुर गटातून या मुरूमचे खोदकाम करण्यात आल्याने तहसीलदारांनी इर्री ग्रामपंचायतला १२ लाख ४३ हजार ६८० रूपयांचा दंड ठोठावला आहे. एवढेच नव्हे तर, दंडाची रक्कम त्वरीत भरण्याचे आदेश १६ जुलै रोजी काढले आहेत.
ग्राम इर्री येथे पांदन रस्त्यासाठी लागणारे मुरूम गट क्रमांक ९४८ आराजी ४ हेआर पैकी १ हेआर जागेतून काढण्याची मंजुरी तहसीलदारांनी दिली होती. मंजुरी देण्यात आलेल्या या गटातून २८० ब्रास मुरूम काढायचे होते. त्यासाठी एक लाख ३५ हजार १६० रूपयांची रॉयल्टी ग्रामपंचायतमार्फत भरण्यात आली होती. परिणामी, त्या बाबत ७ जून २०१६ रोजी ग्रामपंचायतला आदेश देण्यात आले होते. परंतु, तहसीलदारांनी मंजुरी दिलेल्या गट क्रमांक ९४८ मधून मुरूम खोदकाम न करता मंजुरी नसलेल्या गट क्रमांक ५४३ आराजी ८.४९ हेआर या तलावाच्या जागेतून मुरूमाचे खोदकाम करण्यात आले. घडलेल्या प्रकारावर आक्षेप घेत सहेसराम श्रीराम उपवंशी यांनी १५ डिसेंबर २०१७ रोजी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. यासंदर्भात ग्राम कामठा येथील मंडळ अधिकारी ए.आर.कोरे यानी चौकशी करून अहवाल सादर केला होता. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी झालेल्या मौका चौकशीत गट क्रमांक ९४८ आराजी ४ असून पहाडी मलमा आहे. त्या ठिकाणी कुठलेही खोदकाम नाही. परंतु, गट क्रमांक ५४३ ची मंजुरी नसताना या तलावातून खोदकाम करण्यात आल्याचे त्यांनी चौकशी अहवालात नमूद केले.ग्राम इर्री येथील अवैध मुरूम खोदकाम प्रकरणी गोंदिया ग्रामीणचे तहसीलदार सी.आर.भंडारी यांनी प्रकरणी इर्री ग्रामपंचायतला १२ लाख ४३ हजार ६८० रूपयांचा दंड ठोठावला आहे. त्याच मुरूमाचे बाजारमुल्य सिएसआर प्रमाणे प्रती घनमीटरच्या दराने प्रती ब्रास ८०३.७० पैसे नुसार पाच पट दंडाची रक्कम ११ लाख २५ हजार १८० रूपये तसेच दंड-स्वामीत्वधन एक लाख १२ हजार रूपये आणि भुपृष्ठ भाडे सहा हजार ५०० रूपये असा एकूण १२ लाख लाख ४३ हजार ६८० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.