नगरपरिषदेच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध : आ. फुके

0
15

पवनी,दि.26 :येथील नगरपरिषदेच्या अनेक समस्या असून त्या तातडीने सोडवून देण्यात येतील. येथील कर्मचारी भरतीचा प्रश्न स्वत: मंत्रालयात जाऊन मार्गी लावण्याचे व न.प. ला आमदार निधी देण्याचे आश्वासन आ. परिणय फुके यांनी दिले. यावेळी नगरपरिषदेच्या वतीने न.प. सभागृहात आ. परिणय फुके यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.न.प. अध्यक्ष पूनम काटेखाये तथा नगरसेवकांनी पवनी शहराच्या समस्यांसंबंधी निवेदन आ.परिणय फुके यांना दिले. या निवेदनात सर्व समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न करेन व त्या समस्या मार्गी लागल्यानंतरच मला बोलवा तेव्हाच मी पवनी न.प. ला भेट देईल असे प्रतिज्ञापूर्वक वचन आ. फुके यांनी दिले. प्रमुख अतिथी म्हणून आ. रामचंद्र अवसरे, न.प. अध्यक्ष पूनम काटेखाये, उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, नगरविकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये उपस्थित होते.विलास काटेखाये यांनी नगर परिषदेच्या अनेक समस्या असून यात प्रामुख्याने कर्मचारी वर्ग अपुरा आहे.नवीन सीमा वाढीच्या समस्या, नागनदीचे दूषित पाणी, मोक्षधाम निर्मिती, पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच स्थायी मुख्याधिकाऱ्यांची त्वरित नियुक्ती करावी आदी समस्या त्यांनी आ. फुके यांच्या समोर मांडल्या.पवनी न.प. च्या समस्या सोडविण्याचे वचन आ. फुके यांनी दिले, परंतु या वचनाची पूर्तता ते करतील की विसरतील याकडे पवनीवासीयांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रशासन अधिकारी चिलबुले यांनी मानले.