दारू दुकान बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला अमान्य

0
16

सालेकसा,दि.26ः- अतिदुर्गम व नक्षल प्रभावित आमगाव खुर्द या गावाची शांतता कायम रहावी, यासाठी ग्रामस्थांनी व विशेष करून महिलांना दारूबंदीसाठी एल्गार पुकारला. त्या अनुषंगाने २१ जुलै २0१८ रोजी विशेष ग्रामसभेत उपस्थित मतदारांनी दारूबंदीच्या बाजूने कौल दिला. हा कौल पुढील निर्णयासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, जिल्हा प्रशासन दखल घेत नसल्याचे पाहून महिलांना कायमस्वरूपी दारूबंदीसाठी उपोषणाला सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री बडोले यांनी आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेवून यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे गावात कायमची दारूबंदी होईल, ही आस लावून बसलेल्या आमगाव खुर्दवासीयांना जोर का झटका, हाय धिरे से लगा अशी म्हणण्याची वेळ प्रशासनाच्या निर्णयाने आली आहे. एंकदरीत प्रशासनाने नियमावर बोट ठेवून देशी-विदेशी दारूची दुकाने कायमस्वरूपी बंद करण्याची विनंती अमान्य केली. आता यापुढे हे प्रकरण वेगळे वळण घेण्याची चर्चा सुरू झाली आहे.
सविस्तर असे की, आमगाव खुर्द या गावात कायमची दारूबंदी व्हावी, यासाठी ग्रामस्थांसह महिलांनी पुढाकार घेतला. तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला दारूबंदीसाठी सहकार्य करण्याचे मागणी केली. त्या अनुषंगाने २१ जुलै रोजी विशेष ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत १४४ पुरूष व २२३ महिला अशा ३६७ मतदारांनी सहभाग नोंदविला. यात दारू दुकान बंद करण्याच्या बाजुने २९0 तर सुरू ठेवण्याचा बाजुने ४१ मते पडली. विशेष म्हणजे ग्रामसभेत किमान ५0 टक्के एकूण मतदार किंवा महिला मतदार उपस्थित राहून साध्या बहुमताने हा ठराव पारित करू शकतात.
त्यातच यासभेत ठराव संमत झाल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी यांनी प्रशासनाकडे पाठविली. व त्यावर निर्णयाची अपेक्षा होती. मात्र, निर्णय येत नसल्याने महिलांनी पुन्हा उपोषणाला सुरूवात केली. त्यातच दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री बडोले सालेकसा दौर्‍यावर असताना उपोषण मंडपाला भेट दिली. तसेच २ दिवसात समस्या मार्गी लावणार, असे आश्‍वासन दिले.
दोन दिवसात समस्या मार्गी लागली. परंतु, या निर्णयाने नविनच समस्या निर्माण झाली आहे. ग्रामसभेत एकूण मतदारांच्या ११.३४ टक्के तर एकूण महिला मतदारांच्या १३.७७ टक्के मतदार उपस्िथत होते. या सभेत त्या विभागाचे निरीक्षक तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागही उपस्थित नव्हते. या कारणासह आमगाव खुर्द या ग्रामपंचायतीचा समावेश सालेकसा नगरपंचायतमध्ये झालेला आहे. तेव्हा ग्रामपंचायत आमगावखुर्द या ग्रामपंचायतीने पारीत केलेल्या विशेष ग्रामसभेच्या ठरावाने सदर ग्रामपंचायत हद्दीतील देशी, विदेशी दारूची दुकाने कायमस्वरूपी बंद करण्याची विनंती अमान्य करण्यात येत असून २५ मार्च २00८ मधील शासन अधिसुचनेनुसार पुनश्‍च मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश अधिक्षक राज्य उत्पादक शुल्क गोंदिया यांनी दिले आहे. तसेच उपोषणकर्त्या महिलांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली असून ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निर्देश दिले आहे.
एकीकडे दारूबंदीसाठी महिला पुढाकार घेत असताना व त्यातही ग्रामसभेच्या ठरावात विजय झाला असताना नियमावर बोट ठेवून हा ठराव अमान्य करण्यात आला. त्यामुळे गावातील दारूबंदी करण्याच्या पुढाकाराला जबर धक्का प्रशासनाच्या निर्णय लागला आहे. या निर्णयाच्या विरोधात ग्रामस्थ पुढे काय भूमिका घेतात? याकडेही तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.