गोंदिया न.प. विषय समिती सभापतींची आज निवड

0
7

गोंदिया : नगर परिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड बुधवारी (दि.११) होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी सभापतींचे पद काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. मात्र नगरपरिषदेतील संख्याबळ बघता सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षासाठी हे काम कठीण दिसून येत आहे. असे असले तरीही राजकारणात काहीही अशक्य नसल्याने निवडणुकीत काय घडणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

नगरपरिषद सभापतींचा कार्यकाळ ११ मार्च रोजी पूर्ण होत असल्याने ही निवडणूक घेतली जात आहे. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगी नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ६३ (२)(ब) नुसार ही निवडणूक घेतली जात आहे. नगरपरिषदेत आज सत्ता भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीची असली तरिही सभापती कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे आहेत. यात बांधकाम समिती सभापती राष्ट्रवादीचे खालीद पठाण, शिक्षण समिती सभापती कॉंग्रेसच्या ममता बंसोड, महिला व बाल कल्याण समिती सभापती कॉंग्रेसच्या अनिता बैरीसाल, पाणी पुरवठा समिती सभापती राष्ट्रवादीच्या कोमल आहुजा तर स्वच्छता व आरोग्य समिती सभापती नगपरिषद उपाध्यक्ष हर्षपाल रंगारी आहे. शिवाय नियोजन व विकास समितीचीही निवड केली जाईल.

त्यातही सद्यस्थितीत राष्ट्रवादीकडे असलेले बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभाग हे आता कॉंग्रेसकडे तर कॉंग्रेसकडे असलेले शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग आणि नियोजन व विकास समिती राष्ट्रवादीकडे येणार आहे. त्यामुळे या पदासांठी या पक्षांनीही सेटींग करण्यास सुरूवात केली आहे.

वास्तवीक मात्र, नगरपरिषदेतील राजकीय पक्षांचे संख्याबळ बघता भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे संख्याबळ कमी असून त्यामुळेच त्यांना सभापती पद काबीज करणे कठिण दिसून येत आहे.