चंद्रपूर मनपाच्या सभेत कचरा घोटाळा गाजला

0
18

चंद्रपूर -कचरा घोटाळ्यावरून महापालिकेच्या आजच्या आमसभेत चांगलाच गदारोळ झाला. कचऱ्यामुळे भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याने हा विषय स्थगित ठेवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिल्याचे भाजप नगरसेविका पोटतिडकीने सांगत असतानाच भाजपच्याच महापौर व उपमहापौराने स्थगितीचा प्रस्ताव धुडकावून लावला. विशेष म्हणजे, भाजपच्या महापौर व उपमहापौरच्या बचावासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे व अपक्ष नगरसेवक पुढे सरसावल्याचे विचित्र चित्र येथे बघायला मिळाले. दरम्यान, या विषयावर गंभीर चर्चा झाल्यानंतर सभापती रामू तिवारी व शिवसेना नगरसेवक संदीप आवारी यांनी उपोषणकर्ते नंदू नागरकर यांना तीन दिवसाचा अवधी दिला आहे.
महापालिकेची आमसभा महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंता देशमुख, सभापती रामू तिवारी, आयुक्त सुधीर शंभरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १ वाजता सुरू झाली. सभा सुरू होताच कचरा घोटाळ्याचा विषय भाजप नगरसेविका अंजली घोटेकर व वनश्री गेडाम यांनी चर्चेला आणला. २०१३ च्या फेब्रुवारीत २० ते २२ लाख रुपयेप्रमाणे ७ वर्षांचा १७ कोटी दिले आहे. तसेच ते कंत्राट रद्द न करता नव्याने घरोघरी कचरा संकलन २३ फेब्रुवारी २०१५ च्या निविदाची तडजोड करून स्थायी समितीने आपल्याकडे विषय न घेता परस्पर महापौर व उपमहापौरांचा संगनमताने आमसभेत विषय ठेवून १०० टन प्रती रोज कचरा महिन्याचे ५४ लाख रुपये ५ वर्षांचे ३३ कोटी रुपयांची निविदा मंजूर करून घेतली. या दोन्ही निविदा एकत्र काढल्या, तर २५-३० लाख रुपये वाचण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या रद्द कराव्या, ही मागणी लावून धरत मनपाच्या प्रवेशद्वारासमोर शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी महापौर व उपमहापौरांविरोधात उपोषण सुरू केले आहे. तेव्हा कचऱ्याचा विषय स्थगित ठेवा किंवा हे कंत्राट रद्द करा, अशी मागणी घोटेकर यांनी केली.
अर्थमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कचऱ्याचा विषय गांभीर्याने घेतला आहे. कचऱ्यामुळे भाजपा नेत्यांची प्रतिमा शहरात नाहक डागाळली जात आहे तेव्हा जनतेत नेत्यांची प्रतिमा स्वच्छ ठेवायची असेल तर किमान निविदेचे दर तरी कमी करावे, असेही घोटेकर म्हणाल्या. मात्र, त्यांचीही मागणी धुडकावण्यात आली. कचऱ्यावरून भाजपात उघड उघड दोन गट पडले असतानाच काँग्रेसचे गटनेते संतोष लहामगे, राष्ट्रवादीचे संजय वैद्य, मनसे, अपक्ष तथा अन्य काही नगरसेवक कचऱ्याच्या मुद्यावर भाजपा महापौरांचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावल्याचे चित्र येथे बघायला मिळाले.