नागझिरा नवेगावबांध अभयारण्याचे कार्यालय साकोली येथे करा

0
13

साकोली : नागझिरा, न्यू नागझिरा व नवेगावबांध अभयारण्याचे उपवनसंरक्षक (वन्यप्राणी) कार्यालय गोंदिया येथून साकोली येथे स्थानांतरीत करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र दूरसंचार समितीचे सदस्य प्रभाकर सपाटे यांनी वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनातून केली आहे.

नागझिरा, न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्प व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचा कारभार गोंदिया येथील उपवनसंरक्षक (वन्यप्राणी) यांच्या कार्यालयातून चालत आहे. या कार्यालयातून अभयारण्यातील कामकाजावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. साकोली येथे नागझिरा व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान येथे सहाय्यक उपवनसंरक्षक यांचे कार्यालय आहे. वनक्षेत्राधिकारी वनपाल, वनरक्षक व वनमजूर यांच्यावर साकोली व नवेगाव येथील कार्यालयातून नियंत्रण करण्यात येते.

गोंदिया येथील कार्यालयात महिन्यातून आठ – दहा वेळा जावे लागते. त्यामुळे शासनालाच त्याच्या भत्त्याचा भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच गोंदिया येथील कार्यालयातून अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानातील चोऱ्या, शिकारी या घटनावर नियंत्रण ठेवणे अशक्य होत आहे. पर्यटकांना आरक्षण व नोंदणीसाठी गोंदिया येथे नेहमीच संपर्क करावा लागतो. त्यामुळे दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या घटत आहे. नागझिरा अभयारण्यातून गेल्या दहा ते पंधरा वर्षात कोट्यवधींची वनसंपदा नष्ट झाली आहे. अवैध शिकारीचे प्रकरण बरेच गाजले आहे. त्यामुळे सर्व कारभार साकोली येथून करण्यात यावा. साकोलीपासून नागझिरा १८ कि.मी. व न्यू नागझिरा १५ कि.मी. व नवेगावबांध ३० कि.मी. अंतरावर आहे. साकोली हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असून नागपूर विमानतळ १०० कि.मी. व सौंदड रेल्वे स्टेशन १० कि.मी. अंतरावर आहे. पर्यटकांना उपवनसंरक्षक (वन्यप्राणी) यांचे कार्यालय साकोली येथे मध्यस्थानी होईल व सोयीचे होईल. या कार्यालयासाठी साकोली येथे जागा पुरेशी असून मनुष्यबळही उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाचे अनावश्यक खर्च टाळावा व पर्यटकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी साकोली येथे उपवनसंरक्षक यांचे कार्यालय स्थानांतरीत करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी खा.नाना पटोले व आ.बाळा काशीवार यांनाही सपाटे यांनी दिले आहे.