दिव्यांग मतदारांच्या जागृतीसाठी प्रशासन सरसावले

0
17

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न
‘स्वीप’ अंतर्गत उपक्रमात आरोग्य विभागाचा पुढाकार
वाशिम, दि.०4 : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’ समितीचे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. विशेषतः दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर व त्यांच्या चमूने कारंजा व मानोरा तालुक्यातील गावांमध्ये घरोघरी जावून दिव्यांग व इतर नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

‘स्वीप’ समितीच्या बैठकीत नोडल अधिकारी श्री. मीना यांनी दिलेल्या सूचनेनुसार आरोग्य विभागाद्वारे आशा वर्कर्सच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांकरिता निवडणूक आयोगामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची माहिती घरोघरी जावून देण्यात येत आहे. मतदानादिवशी सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांना व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या बाहेर ब्रेल लिपीतील डमी बॅलेट पेपर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅलेट युनिटवर ब्रेल लिपीतील अनुक्रमांक नमूद करण्यात येणार असून त्यामुळे दिव्यांग मतदाराला आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करणे सोपे होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व मतदान केंद्रांवर प्रथमोपचार पेटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याविषयी माहिती देण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आहेर यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, आशा गटप्रवर्तक व गाव पातळीवरील आशा यांनी आज कारंजा व मानोरा तालुक्यातील काही कुटुंबांना भेटी देवून मतदान करण्याचे आवाहन केले.

दिव्यांग बांधवांनी आपले मत अवश्य नोंदवावे : डॉ. अविनाश आहेर

प्रत्यक्ष मतदानादिवशी दिव्यांग मतदारांच्या सहाय्यतेसाठी मतदान केंद्रांवर आशा वर्कर्स व स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे या मतदारांना मतदानासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तरी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदार बांधवांनी ११ एप्रिल रोजी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ व १८ एप्रिल रोजी अकोला लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या मतदानाप्रसंगी आपले मत अवश्य नोंदवावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले आहे.