26.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ जिल्ह्यातील ३५५८ दिव्यांग मतदार बजावणार मतदानाचा हक्क

जिल्ह्यातील ३५५८ दिव्यांग मतदार बजावणार मतदानाचा हक्क

0
57

५५३ ग्रामपंचायत अंतर्गत ७१४ व्हील चेअर तर
नागरी क्षेत्रात ८२ व्हील चेअर उपलब्ध
गोंदिया,दि.४. : येत्या ११ एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्यांना व्हील चेअर, रॅम्स सह अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ३५५८ दिव्यांग मतदार या निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघात ८४५, तिरोडा विधानसभा मतदारसंघात ९०३, गोंदिया विधानसभा मतदारसंघात ६८९ आणि आमगाव विधानसभा क्षेत्रात ११२१ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. यामध्ये ४३९ अंध मतदार, ३८५ कर्णबधीर मतदार, २२५५ अस्थीव्यंग मतदार आणि अन्य प्रकारचे दिव्यांगत्व असलेले ४७९ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतीअंतर्गत दिव्यांग मतदारांना मतदान करता यावे यासाठी ७१४ व्हील चेअरची तर तर ८ नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात ८२ व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाने तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सर्वप्रकारच्या दिव्यांग मतदारांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सूचना दिल्यानुसार जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रावर दिव्यांगांना सहजपणे मतदान करता यावे यासाठी रॅम्स व व्हील चेअरची सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहे. जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना रांगेत प्रतिक्षेत न राहता मतदान करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर कायमस्वरुपी किंवा संपूर्ण सुविधा, अंध मतदारांकरीता ब्रेल लिपीतील मतदार स्लीप, अल्पदृष्टी मतदारांकरीता मॅग्नीफाईन ग्लास व डमी मतदान पत्र आदी साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अंध असलेल्या मतदाराला मतदानासाठी सहकार्य करण्यासाठी मतदान अधिकाऱ्याच्या परवानगीने मतदान करण्यास एका व्यक्तीला सोबत नेण्याची परवानगी देण्यात येईल. दिव्यांग मतदाराला मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी विशेष शिक्षक तसेच दिव्यांग शाळेतील कर्मचारी, स्वयंसेवक मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत.

blank