नागपुरात कृत्रिम अवयव निर्मिती केंद्र

0
23

नागपूर : नागपुरात पाच एकर जागा उपलब्ध झाल्यास महिन्याभरात ‘कम्पोजिट रिजनल सेंटर’ (कृत्रिम अवयव निर्मिती केंद्र) सुरु करण्यात येईल. यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी दिली.

भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स रिसर्च अ‍ॅण्ड ह्युमन रिसोर्सेस व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी रेशीमबाग येथे ‘कम्पोजिट शिबिर व अपंग व्यक्तींना नि:शुल्क साहित्य वितरण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या शिबिरात ५ हजार ४९२ लाभार्थ्यांना ६ कोटी ७२ लाख ३३ हजार रुपयांचे नि:शुल्क साहित्य वाटप करण्यात आले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय भूूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रवीण दटके, खासदार कृपाल तुमाने व अखिल भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवाप्रमुख सुहासराव हिरेमठ उपस्थित होते.

या प्रसंगी राजकुमार बडोले, सुहासराव हिरेमठ यांनीही आपले मत मांडले. प्रास्ताविक डिसेबिलिटी कार्य विभागाचे संयुक्त सचिव अविनाश अवस्थी यांनी केले. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे सचिव लव वर्मा यांनी विभागाच्या योजनांची माहिती दिली. पंडिल दीनदयाल उपाध्याय संस्थेचे डॉ. विराल कामदार यांनी संस्थेने आतापर्यंत राबविलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. संचालन रेणुका देशकर यांनी केले. दरम्यान, कार्यक्र माच्या सुरु वातीला दोन मिनिट मौन बाळगून सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली कुआन यू यांना उपस्थितांनी श्रध्दांजली वाहिली. कार्यक्रमाला आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. विकास कुंभारे, आ. अनिल सोले डॉ. मिलिंद माने, आ. सुधाकर कोहळे, आ. नागो गाणार, उपस्थित होते. रंजना ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जयसिंग चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ‘लिमको कंपनी’च्यावतीने तयार करण्यात आलेल्या फोल्डींग ट्रायसिकलचे लोकार्पण यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

या शिबिरास अंध, अपंग व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.