वाढिव मजुरीसाठी पाथरीत काम बंद,तर चिचगावमध्ये मात्र अभियंताच मागतो पैसे

0
14

गोरेगाव,दि.27 : तालुक्यातील आदर्श खासदार दत्तक गाव पाथरी येथे मनरेगाअंतर्गत गावतलावाचे गाळ काढण्याचे काम बुधवारी २४ एप्रिल रोजी सुरू करण्यासाठी सहायक कार्यक्रम अधिकारी यांनी ४२४ मजुरांचे हजेरी पट काढले होते. हे हजेरी पट ३0 एप्रिलपर्यंतचे आहे. त्यानुसार, २४ एप्रिल रोजी काम सुरू करण्यात आले. परंतु, गावातील मजुरांनी कामावर दाम नको तर प्रत्येक मजुराला २00 रुपये मजुरी द्यावी, अशी मागणी करीत काम बंद ठेवले. मनरेगा अभियंता विवेक शेंडे यांनी काम सुरू करण्यास मजुरांना प्रोत्साहित केले नाही. त्यामुळे गरजू मजूर कामापासून वंचित राहिले.तर दुसरीकडे याच तालुक्यातील चिचगाव येथे सुध्दा काम सुरु असून जवळपास या ठिकाणी 300 च्यावर मजुर कामावर आहेत.त्या मजुराकडून सबंधित रहागंडाले नामक अभियंता मजुरीत वाढ करुन देण्यासाठी परमजुर 20 रुपयाची मागणी करीत असल्याची माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे या अभियंत्याची तक्रार गावातील लोकप्रतिनिधीपासून तालुकास्तरावरील अधिकारी व प्रसारमाध्यमांच्या लोकापर्यंत एक आठवड्या आधीच गेल्याची माहीती समोर आली परंतु चिचगाव येथे पैसे मागणार्या अभियंत्याच्या बचावासाठी कोण पुढे आलाय यावर चर्चा सुरु झाल्या आहेत.
मनरेगाअंतर्गत पाथरी येथे गावतलावातील गाळ काढण्याच्या कामासाठी १८ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे मजुरांनी यापूर्वी काम केले होते. त्यात मजुरांना १00 रुपये रोजी मळाली होती. याबाबत मजुरांनी रोजगारसेवक, मनरेगा अभियंता यांच्यावर नाराजी दाखवली होती. त्यातच पुन्हा मजुरांनी कामाची मागणी केली असता प्रशासनाने गावतलावातील उर्वरित गाळ काढण्याच्या कामाला मंजुरी दिली. सहायक कार्यक्रम अधिकारी यांनी पाथरीच्या ४२४ मजुरांचे मस्टर (हजेरी पट) २४ एप्रिल ते ३0 एप्रिलपर्यंतचे काढले होते. हे काम बुधवारी (दि. २४) सुरू करण्यासाठी मनरेगा अभियंता विवेक शेंडे यांनी पाथरीच्या गावतलावास भेट दिली असता मजुरांनी सरसकट प्रतिव्यक्ती २00 रुपये मजुरीची मागणी रेटून धरली. परंतु, अभियंता विवेक शेंडे यांनी या मागणीस नकार दिला. त्यामुळे मजुरांनी काम बंद ठेवून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.