‘जेल ब्रेक’ मदतनीसांकडे मिळाला शस्त्रसाठा

0
18

नागपूर : राजा गौस गँगच्या सदस्यांना जेलमधून फरार होण्यास मदत करणाऱ्या आणखी दोन गुन्हेगारांना पोलिसांनी शस्त्राच्या साठ्यासह अटक केली आहे. त्यांच्याकडुन ५ देशी पिस्तूल आणि ३७ काडतुसे जप्त केली आहेत. ‘जेल ब्रेक’च्या घटनेनंतर पोलिसांना हे दुसरे यश मिळाले आहे, ही माहिती पोलीस आयुक्त के.के. पाठक यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.

अटक करण्यता आलेल्या आरोपींमध्ये शेख वाजीद शेख मोहम्मद ऊर्फ राजू बढियारा ऊर्फ अबरार (३०) रा यासीन प्लॉट, ताजाबाद आणि चेतन ऊर्फ अवीर सुनील हजारे (२४) रा. बारा सिग्नल बोरकरनगर यांचा समावेश आहे. सोमवारी पोलिसांनी नवाब शेख आणि गणेश शर्मा नावाच्या आरोपींना पकडले होते. ३१ मार्च रोजी पहाटे राजा गौस टोळीचे सदस्य सत्येंद्र गुप्ता, शोएब ऊर्फ शिबू, बिसेन उईके आणि त्यांचे दोन साथीदार प्रेम नेपाली, गोलू ठाकूर हे कारागृहातून फरार झाले होते. पोलिसांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स सर्व्हिलन्स’च्या मदतीने सोमवारी नवाब शेख आणि गणेश शर्मा यांचा सुगावा लावून त्यांना अटक केली होती. सत्येंद्रने या दोघांना तीन आठवड्यापूर्वी कारागृहातून पळुून जाण्याची आपली योजना सांगून मदत मागितली होती. ३१ मार्च रोजी पहाटे गणेश शर्मा याने पाचही कच्च्या कैद्यांना कारागृहातून बाहेर काढून आपल्या मोटरसायकलवर बसवून सोडले होते. तपासात अबरार आणि चेतन हजारे यांची कैद्यांच्या पलायनात महत्त्वाची भूमिका असल्याचे पोलिसांना समजले होते. बुधवारी दुपारी हे दोघेही सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळले होते. पोलिसांनी त्यांना अटक केली. अबरारजवळून ४ देशी पिस्तूल आणि ३६ काडतुसे तर चेतनकडुन १ पिस्तूल व १ काडतूस जप्त करण्यात आले. चौकशीत या दोघांनी राजा गौस आणि सत्येंद्र गुप्ता यांच्याशी आपला संबंध असल्याचे कबूल केले आहे. सत्येंद्रला आपण जेल ब्रेक करण्यात मदत केली, असेही त्याने कबूल केले आहे. हे दोघेही सत्येंद्रला कारागृहात जेवण, पैसा आणि अन्य ऐषोआरामाच्या वस्तू पुरवत होते.

त्यांची राजा आणि सत्येंद्रसोबत बातचित होत होती. पोलीस आयुक्तांनी असे सांगितले की, अबरार हा बऱ्याच काळापासून राजा गौस टोळीसोबत जुळलेला आहे. लखनादौनचे कारागृह तोडण्याच्या घटनेत अबरारही सहभागी होता. परंतु तो पळून जाऊ शकला नव्हता. अबरार आणि चेतन हे अनेक वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय आहेत. त्यांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून जाण्याच्या योजनेची माहिती होती. पोलीस आयुक्तांनी राजा गौस याचाही जेलब्रेक योजनेत सहभाग असल्याच्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, राजा गौस हा टोळीचा सूत्रधार आहे. त्यामुळे या योजनेत त्याची भूमिका महत्त्वाची असण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्तांनी पुढे असेही सांगितले की, फरार कच्च्या कैद्यांचा शोध गुन्हेशाखेचे तीन अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथक करीत आहे. हे पथक सात शेजारील राज्यात फिरत आहे. जेल प्रशासनाने कैदी फरार झाल्याच्या घटनेची माहिती उशिरा दिली. पोलिसांना ही सूचना सकाळी ७ वाजता मिळाली. परंतु कैदी पहाटे ४ वाजताच पसार झाले होते. पाठक यांनी कारागृह परिसरात रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत कारागृहाच्या बाह्यमार्गांवर गस्त राहत असल्याचे सांगितले.