गोरेगावच्या सौंदर्यीकरणात पडणार भर

0
13

गोरेगाव,दि.25 : येथील नगर पंचायत अंतर्गत येणार्‍या रस्त्यांच्या विकासासाठी आ. विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नाने शासनाकडून १0 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, हा निधी कमी पडत असल्याने आ. रहांगडाले यांनी वाढीव निधीसाठी पाठ पुरावा करून आणखी ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला आहे. त्यामुळे गोरेगावच्या रस्ते विकासासह सौंदर्यीकरणात आता आणखी भर पडणार आहे.
स्थानिक नगरपंचायतीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्यामुळे तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यावर वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी तातडीने गोरेगाव नगरपंचायतीला १0 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून विकास कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र, हा निधी अपुरा पडत असल्याने आ. रहांगडाले यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान वित्तमंत्र्यांना गोरेगाव येथील रस्ते विकास व सौंदर्यीकरणासाठी अधिकच्या निधीची मागणी केली होती, तर त्यासाठी पाठपुरावा देखील केला. दरम्यान, शासनाकडून आता ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील रस्ते विकास व सौंदर्यीकरणात भरत पडणार असल्याचे गोरेगावचे नगराध्यक्ष इंजि. आशिष बारेवार यांनी व्यक्त केला आहे. तर गोरेगावच्या विकासात आ. रहांगडाले यांचा मोलाचा वाटा असून त्यांचे नगराध्यक्ष बारेवार व नगर पंचायत सदस्यांनी आभार व्यक्त केले आहे.