38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ जिल्ह्यात जलसंवर्धनास चालना देणार-जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

जिल्ह्यात जलसंवर्धनास चालना देणार-जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

0
54

blank

वाशिम, दि. ८ जून  –पाण्याच्या संकटावर मात करून राज्यात जलसंपत्तीचा शाश्वत विकास साधण्यासाठी राज्य शासन विविध योजना राबवत आहे. जलसंवर्धन, सिंचन आणि जलयुक्त शिवार यासारख्या उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाशिम जिल्ह्याचा दौरा करून जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला.

राज्याचे जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे पाटील हे आज, ८ जून २०२५ रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी वाशिम येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर आढावा बैठक घेतली.
या बैठकीत जिल्ह्यातील सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांचा, जलसंधारण योजनांची अंमलबजावणी, तसेच पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला.
बैठकीत बोलताना मंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, “शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जलसंपत्तीचा न्याय्य व कार्यक्षम वापर सुनिश्चित करणे ही प्राथमिकता आहे. जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबवून जिल्ह्याचा विकास साधण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे.
या बैठकीस विधानसभा सदस्य आमदार श्याम खोडे,जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली देवकर,डीपीओ राजेश सोनखासकर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शुभम जोशी, मृदू व जलसंधारण कार्यकारी अभियंता श्याम फेरवाणी, जलसंपदा कार्यकारी अभियंता संजय जेवलीकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सिंचनाची स्थिती, धरणांची सध्याची क्षमता, अपूर्ण प्रकल्पांची माहिती, जलयुक्त शिवार, शाश्वत जलसंधारण, मृद व जलसंवर्धन योजनेची प्रगती यासंदर्भात संबंधित विभागांनी सविस्तर माहिती सादर केली.
या बैठकीनंतर मंत्री डॉ. विखे पाटील काही महत्त्वाच्या जलसंपदा प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा दौरा जिल्ह्यातील जलव्यवस्थापनास नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास स्थानिक प्रशासन व नागरिकांनी व्यक्त केला आहे.

blank