येणारी लढाई आपल्याला जिंकायची आहे-नाना पटोले

0
11

सडक-अर्जुनी/गोरेगाव,दि.25 : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी खचून जावू नये. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपल्याला कामाला लागायचे आहे. येणारी विधानसभेची लढाई आपल्याला जिंकायची आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय किसान काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच प्रचार समितीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळावा प्रसंगी (दि.२१) व्यक्त केले. तालुका काँग्रेसच्यावतीने रविवारी (दि.२१) आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आ. रामरतनबापू राऊत, जिल्हाध्यक्ष बाबा कटरे,एड के.आर.शेंडे, नामदेव किरसान, अमर वराडे,माजी सभापती पी.जी.कटरे,डाॅ.झामसिंह बघेले,डेमेंद्र रहागंडाले, जि.प.सदस्य सरीता कापगते, सरपंच गायत्री इरले, रत्नदीप दहिवले, डॉ. बबन कांबळे,जितेंद्र कटरे, तालुका अध्यक्ष भागवत नाकाडे, राजू पटले, अनिल राजगिरे, रिहान शेख, दामोदर नेवारे, निशांत राऊत, विलास कापगते, जागेश्वर धनभाते, इसू पटेल,जगदिश येरोला,पंचायत समिती जिल्हा परिषद व नगरपंचायतचे सदस्य  प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना पटोले यांनी, या सरकारने शिक्षण व नोकरीचे दार बंद केले.ज्यांच्या जवळ पैसा आहे, त्यांनाच चांगले शिक्षण घेता येते. कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची फक्त लुट आणि दिशाभूल करण्याचे काम या सरकारने केले आहे. जीएसटीच्या नावावर देखील गरीब व शेतकºयांचा पैसा अदानी आणि अंबानी सारख्या धनाढ्य लोकांच्या घशात गेला.
उज्वला गॅसच्या नावावर देखील गोरगरीब जनतेची लुट चालविण्यात आली आहे. आज गरीबांच्या घरचा गॅस शोभेची वस्तू बनली आहे. त्यांच्याजवळच गॅस हंडा भरायला पैसे नाहीत म्हणून गॅसचे हंडे या महागाईमुळे गरीब लोक भरु शकत नाही. या सर्व गोष्टीमुळे कार्यकर्त्यानी नवीन जोमाने कामाला लागावे आणि काँग्रेस पक्ष मजबूत करावी असे आवाहन केले.संचालन डेमेंद्र रहागंडाले व जि.प.सदस्य सरिता कापगते यांनी केले. संचालन निशांत राऊत यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.