न.प.च्या सर्व शाळा डिजिटल करण्याचा निर्धार-नगराध्यक्षा योगिता पिपरे

0
13

गडचिरोली,दि.09ः –  शालेय  विद्यार्थ्याना डिजिटल ज्ञान मिळावे आणि त्यामधून  विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साध्य करणे सोपे व्हावे याकरिता नगरपरिषद गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा डिजिटल करण्याचा निर्धार नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी केले आहे.यावेळी इंदिरानगर न.प.प्राथमिक  शाळेतील  विद्यार्थ्याना गणवेश, स्कुल बॅग, बुट, साॅक्स व इतर साहित्याचे वितरण नगराध्यक्षा सौ.योगिता पिपरे यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच नगर परिषदेच्या निधीमधून तयार करण्यात आलेल्या बगिच्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

नगरपरिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर येथे विद्यार्थ्याना साहित्य वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगराध्यक्षा पिपरे बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून न.प.चे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेवक प्रविण वाघरे,  शाळा समितीचे अध्यक्ष अषोक नैताम, शा.स.उपाध्यक्ष शुभांगी चापले, नम्रता खोब्रागडे, माधुरी कंदिकूरवार, वर्षा खेवले, मधूकर सडमाके, मुख्याध्यापक प्रमोद भानारकर   उपस्थित होते.
पुढे बोलतांना नगराध्यक्षा पिपरे म्हणाल्या, मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतू 33 कोटी वृक्ष महाराष्ट्रात लावणार असल्याचे लक्ष्य ठरलेले आहे. यामध्ये न.प.गडचिरोलीचा वाटा म्हणून 2 हजार वृक्ष विविध ठिकाणी लावून पूर्ण करणार आहोत. त्यामुळे प्रत्येक  शाळेमध्ये खुल्या मैदानात व सार्वजनिक रस्त्यावर वृक्षारोपणाचे कार्यक्रम न.प.गडचिरोलीने हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून इंदिरानगर न.प. शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच न.प.च्या दहाही  शाळांमध्ये विद्यार्थ्याना गणवेश, स्कुल बॅग, बुट, साॅक्स व इतर साहित्याचे वितरण करण्यात आले. न.प.च्या सर्व  शाळांमध्ये पिण्याचे शुध्द पाणी विद्यार्थ्याना  मिळावे याकरिता आरो वाॅटर फिल्टर मशिन देणार असल्याचेही नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रमोद भानारकर, संचालन प्रशांत आकनुरवार तर आभार लिना कैपिल्यावार यांनी मानले.  यावेळी चांदेवार, सर्व शाळा समिती सदस्य, पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.