वर्गखोलीत साचलेल्या पाण्यात बसून घ्यावे लागते शिक्षण

0
13

सडक अर्जुनी,दि.09: कोणताही मुलगा-मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, असे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या शासनाच्या अखत्यारीत असलेल्या जि.प. शाळेत मात्र विद्यार्थ्यांना चिखल व पाण्यात बसून शिकावे लागत असल्याची वस्तुस्थिती गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात समोर आली आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथे असलेल्या जि.प. शाळेत ही स्थिती दरवर्षी पाहता येणारी आहे. येथील मुलांना बसायला बेंच असल्याने ती चिखलात भिजत नाहीत, एवढाच काय तो त्यात दिलासा आहे.येथील जि.प. शाळेत पहिली ते आठवीचे वर्ग असून १८० विद्यार्थी आहेत. येथे एकूण ११ वर्ग खोल्या आहेत. त्या सर्व पावसाळ्यात गळतात. त्यामुळे वरून पावसाचे पाणी पडते आहे आणि देशाचे भावी नागरिक शिकत आहेत असे इथले दृश्य असते.वर्गात पाणी साठल्याने व फरशा नसल्याने तेथे चिखल होतो. शाळेतील शैक्षणिक साहित्यही त्यात ओले होते. मुलामुलींना दुपारचा डबा खाण्यासाठी जागेवरच बसावे लागते. कारण सर्वत्रच पाणी व चिखलाचे साम्राज्य आहे.या शाळेकडे तात्काळ लक्ष देऊन वर्गखोल्यांची दुरुस्ती केली जावी अशी मागणी पोलिस पाटील व ग्रामस्थांनी केली आहे.