गोरेगाव,दि.1८ : तालुक्यातील शासकीय-खासगी कार्यालय, बँक तसेच ग्राहकांना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी मुख्य दूरसंचार विभागातंर्गत ८ उपविभागीय दूरसंचार केंद्र सेवा देतात. या मुख्य केंद्रासह उपकेंद्रांनी महावितरण कंपनीचे १३ कोटी ४५ हजार रुपयांचे वीजबील थकविल्याने महावितरणने वीज कापली आहे. त्यामुळे तालुक्यातील गत १५ दिवसांपासून बीएसएनएल सेवा ठप्प झाली असून ग्राहक बेजार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरण कंपनीने गोरेगाव मुख्य दूरसंचार विभागासह कवलेवाडा, कुड्ढहाडी, तिमेझरी, मुंडीपार, पालेवाडा, बबई, चोपा, सोनी या उपविभागांना वीजजोडणी दिली होती. दूरसंचार विभागाने महावितरण कंपनीचे वीजबील भरले नाही. अनेकद वीजबील भरण्याची सूचना महावितरणने या विभागाला दिली होती. परंतु वीजबिल भरण्यात आले नाही. शेवटी महावितरण कंपनीने गोरेगाव, कवलेवाडा, कुर्हाडी, तिमेझरी, मुंडीपार, पालेवाडा, बबई, चोपा व सोनी या उपकेंद्रांची वीजजोडणी कापली आहे. त्यामुळे बीएसएनएलची सेवा गत १५ दिवसापासून बंद पडली आहे. त्याचा फटका शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालय, बँकांसह इंटरनेटशी संबंधित सर्वच बाबींना बसत असून नागरिकांचीही ऑनलाईन कामे खोळंबली आहेत. यासंदर्भात गोरेगावचे टेलीकॉम टेक्निशियन टी.बी. रहांगडाले यांनी सांगितले की, मुख्य दूरसंचार विभागासह उपविभाग दूरसंचर विभागांची वीज थकबाकी असल्याने महावितरणने कापली आहे. मात्र कार्यालयातील जनरेटर व बॅटरी सेवेच्या माध्यमातून सेवा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.




