32.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ उचितकर अंध आश्रमशाळेत विधी मार्गदर्शन शिबीर

उचितकर अंध आश्रमशाळेत विधी मार्गदर्शन शिबीर

0
36

वाशिम, दि. 26 : वाशिमपासून जवळच असलेल्या केकतउमरा येथील उचितकर अंध आश्रमशाळेत 26 डिसेंबर रोजी दिव्यांग मुलांसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ए. जी. बिलोलीकर यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने विधी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी. पी. देशपांडे यांनी उपस्थित मुलामुलींना मार्गदर्शन केले. या अंध आश्रमशाळेत श्री. उचितकर यांच्या मुलासह विविध ठिकाणची 10 ते 12 अंध मुले मुली राहत असून सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे राहतात. श्री. उचितकर हे सर्वांना आपल्या अपत्याप्रमाणे सांभाळतात. यावेळी  लक्ष्मीने  स्वागत गीत म्हटले. श्री उचितकर यांनी त्यांच्या खडतर संघर्षाची माहिती दिली. आता अंध मुले  हे संगीताचे कार्यक्रम करुन आपआपले घर चालण्यात मोठा हातभार लावतात. त्यांचे कार्यक्रम विविध राज्यात होतात. शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही मदतीशिवाय स्वपरिश्रमाने हा आश्रम उभारला आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. देशपांडे यांनी मुलांचे कौतुक केले, ते म्हणाले त्यांना कुठल्याही प्रकारची कायदेशीर मदतीची गरज पडल्यास विधि सेवा प्राधिकरण वाशिम त्यांना सदैव मदत करेल असे सांगितले. ते पुढे म्हणाले, अंध मुले ही समाजास नवी दृष्टी देत आहेत.  विनाकारण जीवनात नाराज असणाऱ्या लोकांना उचितकर आश्रमशाळेतील मुलांकडून पुष्कळ शिकता येईल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधी सेवक श्री खडसे यांनी परिश्रम घेतले.