39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या कामाला 50 कोटी रुपये देणार- नाना पटोले

धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या कामाला 50 कोटी रुपये देणार- नाना पटोले

0
30

गोंदिया, दि. 7 : गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-2 च्या कामासाठी 150 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यासाठी सन 2019-20 मध्ये 50 कोटी रुपये देण्यात येतील आणि उर्वरित रक्कम पुढील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल. या प्रकल्पाच्या कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. त्यासाठी प्रकल्प कामास गती देऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई येथे  संबंधितांना दिल्या.विधानभवनात धापेवाडा टप्पा-2, 3 आणि गोसीखुर्द प्रकल्प पुनर्वसन संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

या माध्यमातून चोरकमारा आणि बोदलकसा या दोन्ही प्रकल्पात पाणी सोडून 11 हजार 300 हेक्टर सिंचना क्षमता निर्माण होणार आहे. त्यातून गोंदिया जिल्ह्यातील 76 गावांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करावे, असेही श्री.पटोले यांनी सांगितले.भंडारा जिल्ह्यातील धारगाव उपसा सिंचन योजनेचे काम दोन टप्प्यात करुन याबाबतचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा आणि हा प्रकल्प गोसीखुर्द प्रकल्पाचा भाग म्हणून न करता स्वतंत्र प्रकल्प म्हणून प्रस्ताव शासनास सादर करावा. गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर समन्वय ठेवावा तसेच संबंधित विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत, असे निर्देश श्री.पटोले यांनी दिले.

बैठकीस जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस. चहल, वित्त विभागाचे सचिव राजीव कुमार मितल, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.