33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ प्रत्येक बालकास पोलिओ डोज मिळाले पाहिजे

प्रत्येक बालकास पोलिओ डोज मिळाले पाहिजे

0
38

गडचिरोली,दि.11ः-पोलिओ आजारापासून प्रत्येक बालक मुक्त झाला पाहिजे. त्यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २0१९-२0 अंतर्गत १९ जानेवारीला राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक पात्र बालकास पोलिओ डोज मिळाले पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात ८ जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण समन्वय समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशीकांत शंभरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपचंद सोयाम तसेच पल्स पोलिस लसीकरण मोहिमेसंबंधित सर्व यंत्रणांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
पल्स पोलिओ माहिमेबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.साजिद सर्वेलंस यांनी पीपीटीद्वारे पल्स पोलिओ मोहिमेबाबत माहिती दिली. चालू वर्षात १0 मार्च २0१९ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे विशेष सत्र राबविण्यात आले. २0१९-२0 अंतर्गत १९ जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 0-५ वर्ष वयोगटातील ९0 हजार ३५३ अपेक्षित लाभार्थी बालके आहेत. याकरिता ग्रामीण भागात २ हजार ७५ व शहरी भागात ४८ असे एकूण २ हजार १२३ लसीकरण बुथ आहेत. आवश्यक पोलिओ मात्रा ग्रामीण व शहरी मिळून १ लाख १७ हजार ७८४ लस उपलब्ध आहेत. तसेच पल्स पोलीओ मोहिमेकरिता एकूण ६ हजार ४४0 मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच पल्स पोलिओ कृती नियोजन सादर करण्यात आला, असेही डॉ. सुनील मडावी सांगितले.
तालुकास्तरावर पल्स पोलिओ टास्क फोर्स सभा घेण्यात यावी, शाळा स्तरावर प्रभातफेरी काढून मोहीमेचा प्रसार करण्यात यावा, जिल्ह्यातील 0-५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलीओ लसीच्या मात्रा देण्यात येणार आहेत, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.यावेळी पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेशी संबंधित सर्व यंत्रणांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.