अवैध गौण; शिवसेनेचे आमरण उपोषण

0
13

लाखांदूर दि. 8: अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे पकडलेले वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतरही दंड रक्कम शासनजमा न झाल्याने त्यांची चौकशी व दोषीवर कारवाईची मागणी करीत तालुका शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरु केले.
दि. ८ जानेवारी २0१५ ला पहाटे ६ वाजताचे दरम्यान शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मौजा सोनी येथील सुखदेवे व वासनिक यांचे ट्रॅक्टर अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करताना महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी पकडले. सोबतच त्याच दिवशी भागळी येथील डोंगरे व जिभकाटे यांचे ट्रॅक्टर सुद्धा अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करताना पकडून तहसील कार्यालयात जमा केले. दिवसभराच्या कारवाईत अधिकार्‍यांना कारवाई केल्याचे दाखवून बळजबरीने प्रत्येकी २५ हजार रुपये वसूल केल्याचे निवेदनातून आरोप करीत सदर एक लाखाची रक्कम दंडात्मक वसुली दाखविल्याचे सांगण्यात आले. मात्र माहिती अधिकाराखाली या संबंधाने माहिती मागितली असता १ लाखाची रक्कम शासन खजिन्यात जमा झाली नसल्याचे उघडकीस झाल्याचे दिसून आले.
यासंबंधाने वारंवार विचारणा केल्यानंतरही समाधानकारक उत्तर किंवा माहिती न मिळाल्याने अखेर तालुका शिवसेनेच्या वतीने दि. २ मे २0१५ ला लेखी पत्र देवून चौकशीची मागणी करून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला. परंतु अधिकार्‍यांकडून समाधानकारक वागणूक न मिळाल्याने अखेर तहसीलदार हटावची मागणी करीत शिवसेना तालुका संघटक प्रमुख दुर्गा भैय्या राठोड, विलास नान्हे यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला दि. ५ मे पासून सुरुवात केली.